नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : सोने-चांदीने दबाव झुगारत अखेर कमबॅक केलेच. त्याला खास कारण आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी प्रत्येक बाजारात त्याचे नवे रुप दाखवत होते. अमेरिकन बाजारात मौल्यवान धातू दबावाखाली होते. तर आशियातील बाजारात ते तेजीत होते. भारतीय सराफा बाजारात दोन्ही धातूत घसरण सुरु होती. त्यामुळे सोने-चांदी (Gold Silver Price Today 16 September 2023) उसळी घेतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. तो अखेर खरा ठरला. सोने-चांदीत दरवाढ झाली. जागतिक बाजारातील तज्ज्ञानुसार सोने-चांदीने उसळी घेतली असली तरी या रॉकेटमध्ये इंधन जास्त नाही. त्यामुळे सोने-चांदीचे रॉकेट पुन्हा जमिनीवर येणार आहे. जागतिक बाजारातून बळ मिळत नसल्याने सोने-चांदीला अजून मोठी झेप घेता येणार नाही. सध्या सोने-चांदीत इतकी दरवाढ दिसून आली आहे.
सोने चमकले
गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सोन्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. गेल्या पंधरा दिवसांत तर घसरणीचे सत्र सुरु होते. काल त्याला ब्रेक लागला. 15 सप्टेंबर रोजी 200 रुपयांची दरवाढ झाली. त्यापूर्वी सोन्यात जवळपास 800 रुपयांची स्वस्ताई आली होती. 13 सप्टेंबर रोजी सोने 400 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यापूर्वी किंमती जवळपास 400 रुपयांनी उतरल्या होत्या. सध्या दरवाढीनंतर 22 कॅरेट सोने 54850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,820 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे.
चांदीची 500 रुपयांची चढाई
सप्टेंबर महिन्यात चांदीत 5000 रुपयांनी स्वस्त झाली. गेल्या पंधरा दिवसांत चांदीला कामगिरी करता आली नाही. 13 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयाची घसरण झाली. 9 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी भाव घसरले. त्यापूर्वी जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली होती. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 59,016 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,780 रुपये, 22 कॅरेट सोने 54059 रुपये, 18 कॅरेट 44,262 रुपये, 14 कॅरेट सोने 34,524 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,853 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.