नवी दिल्ली | 17 डिसेंबर 2023 : सोने-चांदीच्या किंमतीला पुन्हा लगाम लागला. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीने ग्राहकांना बळ दिले. भाव उतरल्याने ग्राहकांनी जमके खरेदी केली. सलग तीन दिवस ग्राहकांची जणू दिवाळी होती. हा ट्रेंड असाच सुरु राहिल असे वाटत असताना 14 डिसेंबर रोजी गुरुवारी भावात वाढ झाली. शुक्रवारी पुन्हा दरवाढ झाली. शनिवारी मात्र मौल्यवान धातूने ग्राहकांना दिलासा दिला. दोन्ही धातूंचे भाव उतरले. दिवाळीपासून सोने-चांदीने (Gold Silver Price Today 17 December 2023)धडाधड रेकॉर्ड नावावर नोंदवले. अनेक विक्रम मोडीत काढले. त्यामुळे लग्नसराईत सोने खरेदी करण्याच्या उत्साहावर विरजण पडले होते. सोन्यात अजून घसरण होण्याची ग्राहक प्रतिक्षा करत आहेत. काय आहे सोने-चांदीचा भाव?
सोन्याने दिला दिलासा
आठवड्याच्या सुरुवातीला 11 डिसेंबर रोजी आणि 12 डिसेंबर रोजी सोने प्रत्येकी 220 रुपये, बुधवारी 13 डिसेंबर रोजी 100 रुपयांनी उतरले. या तीन दिवसांत सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले. 14 डिसेंबर रोजी सोन्यात 1 हजार रुपयांची वाढ झाली. 15 डिसेंबर रोजी सोने 100 रुपयांनी वधारले. 16 डिसेंबर रोजी 450 रुपयांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत 800 रुपयांची घसरण
आठवड्याच्या सुरुवातीला चांदी हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. गुरुवारी चांदीने 2500 रुपयांची उसळी घेतली. 15 डिसेंबर रोजी चांदीत एक हजारांची वाढ झाली. दोन दिवसांत चांदी 3500 रुपयांनी वाढली. 16 डिसेंबर रोजी चांदीत 800 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,700 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,367 रुपये, 23 कॅरेट 62,117 रुपये, 22 कॅरेट सोने 57,128 रुपये झाले. 18 कॅरेट 46,775 रुपये, 14 कॅरेट सोने 36,485 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,273 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोमवारी मिळवा स्वस्त सोने
सोन्यातील गुंतवणूक पण फायदेशीर ठरते. सोन्याची दागिने तयार करुन घरात ठेवण्यापेक्षा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ही योजना तुम्हाला मालामाल करु शकते. मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा (Sovereign Gold Bond Scheme) 2015 मध्ये सुरु केली होती. या योजनेचा 8 वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. त्यात ग्राहकांना जोरदार परतावा मिळाला आहे. केंद्र सरकार सोमवारी सोन्यात गुंतवणूक करण्याची खास संधी देत आहे. या योजनेत ग्राहकांना 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या भावाने सोन्यात गुंतवणूक करता येईल. या गुंतवणुकीवर जीएसटी वा कर लागत नाही. या योजनेत वार्षिक व्याज पण मिळते. सोमवारपासून सॅव्हरिन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणुकीची संधी मिळेल. भारतीय रिझर्व्ह बँक 18 डिसेंबरपासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची तिसरी मालिका सुरु करत आहे.