भारतीय लोकशाहीचा उत्साह सकाळपासून ओसंडून वाहत आहे. अनेक दिग्गज, बॉलिवूड स्टार, नेते आणि सर्वसामान्य नागरीक या यज्ञात त्यांच्या समिधा टाकतील. त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. पण गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीने त्यांचे हक्काचे मत कुणाच्या पारड्यात टाकले हे वेगळं सांगायला नको. एका वर्षात सोने आणि चांदी सूसाट धावले. अनेक रेकॉर्ड मोडले आणि अनेक विक्रम नावावर नोंदवले. जागतिक बाजारात सोने 3000 डॉलर पोहचण्याची शक्यता आहे. Bloomberg च्या ताज्या आकडेवारीनुसार, जागतिक बाजारात सोने 2,400 डॉलरने वधारले आहे. मध्य-पूर्वेतील म्हणजे हमास-इस्त्राईल, इराण-इस्त्राईल या ताज्या वादाची त्याला फोडणी बसली आहे. भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींची अपडेट तरी काय आहे… (Gold Silver Price Today 19 April 2024)
ब्रेकनंतर सोन्यात घसरण
वर्षभरात 10 ग्रॅममागे सोने 12 हजारांनी वधारले आहे. मार्चनंतर एप्रिल महिन्यात पण सोन्याने जोरदार आघाडी उघडली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याने 1860 रुपयांची चढाई केली होती. या आठवड्यात 15 एप्रिल रोजी त्यात 600 रुपयांची वाढ दिसली. 16 एप्रिल रोजी सोन्याने 980 रुपयांची हनुमान उडी सोन्याने घेतली. 17 एप्रिल रोजी भाव जैसे थे होते. तर 18 एप्रिल रोजी सोने 330 रुपयांनी घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुसंडीनंतर चांदीची माघार
चांदीने एप्रिलच्या पहिल्या 15 दिवसांत 10,500 रुपयांची झेप घेतली. 15 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. तर 16 एप्रिल रोजी किलोमागे 1000 रुपयांनी चांदी महागली. 17 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी घसरली. 18 एप्रिल रोजी किंमतींनी ब्रेक घेतला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 73,477 रुपये, 23 कॅरेट 73,183 रुपये, 22 कॅरेट सोने 67,305 रुपये झाले. 18 कॅरेट 55,108 रुपये, 14 कॅरेट सोने 42,984 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 83,327 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
ही आहेत कारणं
सोने आणि चांदीने हनुमान उडी घेतली आहे. या दरवाढीने ग्राहकांना मोठे कोडे घातले आहे. किंमती इतक्या झटपट कशामुळे वाढल्या, याचा त्यांना प्रश्न पडला आहे.