इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्राईलने काल त्या देशावर हल्ला केला. गेल्या रविवारी इराणने 300 हून अधिक क्षेपणास्त्र इस्त्राईलवर डागली होती. मध्य-पूर्वेत गेल्या दोन -तीन वर्षांपासून संघर्ष वाढला आहे. आता युद्धाचा भडका उडण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात सोने आणि चांदीने उसळी घेतली आहे. मार्च महिन्यापासून सोने आणि चांदीच्या किंमतींनी मोठी भरारी घेतली आहे. एप्रिल महिन्यात तर मौल्यवान धातूंनी सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवले. Reuters या जागतिक वृत्तसंस्थेनुसार, युद्धाच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंमध्ये उसळी आली. स्थानिक बाजारपेठेत सोने उसळले तर चांदीने मात्र दरवाढीला ब्रेक दिला. आता अशा आहेत बेशकिंमती धातूंच्या किंमती..(Gold Silver Price Today 20 April 2024)
सोने उसळले
या आठवड्यात सोने 2140 रुपयांनी वधारले आहे. तर त्यात एकदाच 330 रुपयांची घसरण झाली आहे. 15 एप्रिलला सोने 600 रुपयांनी वधारले. तर दुसऱ्या दिवशी 980 रुपयांची मुसंडी मारली. 17 एप्रिलला भावात फरक दिसला नाही. 18 एप्रिल रोजी सोने 330 रुपयांनी उतरले. 19 एप्रिल रोजी सोने 500 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा दरवाढीला ब्रेक
या महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत चांदी किलोमागे 10,500 रुपयांनी महागली. या आठवड्यात 15 एप्रिल रोजी चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. 16 एप्रिलला 1000 रुपयांची मुसंडी मारली. 17 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी उतरली. 18 आणि 19 एप्रिल रोजी चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 73,404 रुपये, 23 कॅरेट 73,110 रुपये, 22 कॅरेट सोने 67,238 रुपये झाले. 18 कॅरेट 55,053 रुपये, 14 कॅरेट सोने 42,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 82,853 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.