सोने आणि चांदीला महागाईचे वेड लागले आहे, असे म्हटले तर वेड्यांचा डॉक्टर सुद्धा त्याला हरकत घेणार नाही. गेल्या आठवड्यात दोन्ही धातुनी धुळवड खेळली. या धातुची महागाईची भांग अद्यापही उतरलेली नाही. या दोन्ही धातुना महागाईचा चस्का लागला आहे. या वेडामुळे ग्राहकांचे मात्र पानिपत झाले आहे. दोन्ही धातुकडील महागाईचे रंग कायम असल्याने ग्राहकांच्या खिशावर दरोडा पडला आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 20 March 2025 )
ब्रेकनंतर सोन्याची मोठी घोडदौड
मागील आठवड्यात सोने अदमासे 1300 रुपयांनी वधारले. तर या सोमवारी धातुने 110 रुपयांची स्वस्ताई नोंदवली. मंगळवारी 440 रुपये तर बुधवारी तितकीच भाव वाढ नोंदवत सोन्याने ग्राहकांना घाम फोडला. दोन दिवसात हा धातु 880 रुपयांनी महागला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 83,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने आणले तुफान
गेल्या महिन्यात सुस्तावलेल्या चांदीने आता जणू सोन्याशी दरवाढीची स्पर्धाच लावली आहे. चांदी मागील 14 दिवसात 5 हजारांनी महागली. तर या सोमवारी चांदी 100 रुपयांनी कमी झाली. मंगळवारी 1100 रुपयांनी तर बुधवारी 1000 रुपयांचे तुफान आले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,05,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 88,649, 23 कॅरेट 88,294, 22 कॅरेट सोने 81,203 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,487 रुपये, 14 कॅरेट सोने 51,860 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 99,968 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.