दिवाळीसाठी बाजारपेठ सजली आहे. सणांचा राजा दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तर विधानसभा निवडणुकीचे पडघम सुद्धा वाजत आहेत. अशा धामधुमीत सोने आणि चांदीने जबरदस्त धावा चोपल्या आहेत. अवघ्या तीन दिवसांत सोने हजारांनी वाढले. तर चांदीने दोन हजारांची मुसंडी मारली आहे. सोने तर एकाच दिवसात 800 हून अधिक रुपयांनी वधारले आहे. सोने या सणासुदीत 80 हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तर चांदी एक लाखांचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या काळात ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरवाढ होत असताना ग्राहकांना मौल्यवान धातु कधी स्वस्त होईल असा प्रश्न पडला आहे. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 20 October 2024 )
सोन्याचा नवीन रेकॉर्ड
आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात 15 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांची स्वस्ताई आली. त्यानंतर मग सोन्याने दरवाढीचा गिअर टाकला. 16 ऑक्टोबरला 490, 17 सप्टेंबर रोजी 220 रुपयांनी तर 18 ऑक्टोबरला 870 रुपयांची मुसंडी सोन्याने मारली. दिवाळीनंतर ही काही दिवस सोने वधारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण जगातील दोन युद्धांना विराम लागल्यास भाव कमी होऊ शकतो. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने मारली मोठी मजल
चांदीला गेल्या महिन्याच्या अखेरपासून ते या महिन्याच्या मध्यापर्यंत सूर गवसला नव्हता. 5 ऑक्टोबरला चांदी 2 हजारांनी वधारली तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. 11 ऑक्टोबरला चांदी 2 हजारांनी महागली होती. आता 18 ऑक्टोबर रोजी चांदीने 2 हजारांची मजल मारली. या दरवाढीमुळे गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,000 रुपये झाला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,410, 23 कॅरेट 77,100, 22 कॅरेट सोने 70,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,058 रुपये, 14 कॅरेट सोने 45,285 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,283 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.