विधानसभेच्या निवडणुकीत ग्रामीण आणि आदिवासीबहूल भागातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात हिरारीने भाग घेतला. भरभरून मतदान केले. तर इकडे सराफा बाजारात सोने आणि चांदीने महागाईला मतदान केले. संध्याकाळी विविध संस्थांच्या एक्झिट पोलने धुमाकूळ घातला. तर बाजारात सोने आणि चांदीने दरवाढीचा कौल लावला. यामुळे ग्राहकांना ऐन हिवाळ्यात पुन्हा घामटा फुटला. गुंतवणूकदारांना फायदा झाला. मौल्यवान धातुच्या अशा किंमती आता सराफा बाजारात (Gold Silver Price Today 21 November 2024 )
सोन्याची दमदार कामगिरी
गेल्या आठवड्यात सोन्याला सूर गवसला नव्हता. तर या आठवड्यात सोन्याने सलग तिसऱ्या दिवशी महागाईचा झेंडा फडकवला. गेल्या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी स्वस्त झाले होते. या तीन दिवसात सोने जवळपास दोन हजार रुपयांनी महागले. सोमवारी 660, तर मंगळवारी 760 रुपयांची वाढ झाली होती. तर बुधवारी सोन्याने 550 रुपयांची उसळी नोंदवली. आजही सकाळच्या सत्रात सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी 2500 रुपयांनी वधारली
गेल्या दोन आठवड्यापासून चांदीला महागाईला गवसणी घालता आली नाही. या आठवड्यात चांदीने 2500 रुपयांची मुसंडी मारली. 19 नोव्हेंबर रोजी चांदी 2 हजार रुपयांनी वधारली. 20 नोव्हेंबर रोजी 500 रुपयांनी किंमती वधारल्या. आज सकाळच्या सत्रात चांदीने दरवाढीचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,873 23 कॅरेट 75,569, 22 कॅरेट सोने 69,500 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 56,905 रुपये, 14 कॅरेट सोने 44,386 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,956 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.