शेअर बाजारात तुफान तेजीचे सत्र दिसून आले. गुरुवार आणि शुक्रवारी बाजाराने उच्चांकी कामगिरी नोंदवली. गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला. काही थंड बस्त्यातील शेअरने मोठी उसळी घेतली. इकडे सराफा बाजाराने पण या तेजीच्या प्रवाहात उडी घेतली. सोने आणि चांदी तळपले. आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातूंच्या झरझर किंमती वाढल्या. एकाच दिवसात तीन दिवसांची मरगळ झटकून टाकली. या घडामोडींमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 21 September 2024 )
सोन्याची राघो भरारी
गेल्या आठवड्यात सोन्याने हजाराचा पल्ला गाठला होता. या आठड्यात पितृपक्षामुळे सोन्याला सूर गवसला नाही. 17 सप्टेंबरला किंमती 150 रुपयांनी उतरल्या. 18 सप्टेंबर 160 रुपयांची घसरण दिसली. 19 सप्टेंबर रोजी सोने एकूण 250 रुपयांनी स्वस्त झाले. तर 20 सप्टेंबर रोजी सोन्याने 660 रुपयांची भरारी घेतली. आज सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी 1500 रुपयांनी वधारली
गेल्या आठ दिवसांत चांदी 8 हजार रुपयांनी महागली होती. या सोमवारी, 16 सप्टेंबर रोजी किंमतीत हजार रुपयांची भर पडली. पितृपक्ष लागल्यानंतर भाव उतरला. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी प्रत्येकी हजार म्हणजे एकूण 2 हजारांनी चांदी स्वस्त झाली. 20 सप्टेंबर रोजी चांदीत 1500 रुपयांची भर पडली. आज सकाळच्या सत्रात चांदीत दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 74,093, 23 कॅरेट 73,796, 22 कॅरेट सोने 67,869 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 55,570 रुपये, 14 कॅरेट सोने 43,344 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,917 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?
पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.