चांदीने दरवाढीच्या सारीपाटावर मोठा उलटफेर केला आहे. गेल्या तीन महिन्यात चांदीने परतावा देण्यात सोन्यावर मात केली आहे. सोने आणि चांदीने गेल्या वर्षी दिवाळीत मोठी दरवाढ केली. मार्च, एप्रिलमध्ये सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. मे महिन्यात अक्षय तृतीयेनंतर मौल्यवान धातूंनी तुफान धाव घेतली. चांदीने जोरदार घौडदौड सुरु ठेवली आहे. तर सोन्याने दरवाढीला ब्रेक दिला आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव काल 800 रुपयांनी उतरला. चांदी लवकरच एक लाखाचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदीची अशी आहे आता किंमत (Gold Silver Price Today 23 May 2024 )
सोन्याने घेतला विसावा
या आठवड्यात सोन्याने 75 हजाराचा दर गाठला. 20 मे रोजी सोने 500 रुपयांनी वधारले. मंगळवारी त्यात 650 रुपयांची घसरण झाली. बुधवारी भाव स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
घसरणीनंतर पुन्हा उसळी
मागील आठवड्यात चांदी 7,000 रुपयांनी वधारली होती. 18 मे रोजी चांदीने 3900 रुपयांची भरारी घेतली. 20 मे रोजी त्यात 3500 रुपयांची भर पडली. या आठवड्यात 21 मे रोजी 1900 रुपयांनी किंमती कमी झाल्या. तर बुधवारी 22 मे रोजी 1200 रुपयांनी भाव वधारले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,800 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 74,080 रुपये, 23 कॅरेट 73,783 रुपये, 22 कॅरेट सोने 67,857 रुपये झाले. 18 कॅरेट 55,560 रुपये, 14 कॅरेट सोने 43,337 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 92,886 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
दरवाढीचे कारण तरी काय
जागतिक बँकांचे व्याजदर कमी झाले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवला आहे. तर चीनमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. अनेक देशाच्या मध्यवर्ती, केंद्रीय बँक सोन्याचा साठा करुन ठेवत आहेत. या सर्व कारणांमुळे सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.