चांदीने या आठवड्यात मोठी मुसंडी मारली. तर सोन्याने दरवाढीला ब्रेक दिला होता. गेल्या तीन दिवसांत सोने 75 हजारांहून 73 हजारांच्या घरात आले आहे. तर चांदीत पण मोठी पडझड झाली. मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्यात मौल्यवान धातूंनी मोठी झेप घेतली. ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. सोने-चांदीच्या घौडदौडीमुळे हे धातू सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यातून बाहेर जात आहे. त्यामुळे आता 9 कॅरेट सोन्याला हॉलमार्कचा आग्रह धरण्यात येत आहे. आता काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती? (Gold Silver Price Today 24 May 2024 )
सोन्यात मोठी घसरण
या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने 75 हजारांचा टप्पा ओलांडला होता. 20 मे रोजी सोने 500 रुपयांनी महागले. 21 मे रोजी 650 रुपयांनी किंमती उतरल्या. बुधवारी किंमतीत बदल झाला नाही. गुरुवारी 1100 रुपयांनी भाव घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची माघार
गेल्या आठवड्यासह या आठवड्यात चांदीने 12,000 हून अधिकची भरारी घेतली. आता किंमतीत मोठी घसरण झाली. 20 मे रोजी चांदी 3500 रुपयांनी महागली. 21 मे रोजी 1900 रुपयांनी भाव उतरले. 22 मे रोजी 1200 रुपयांनी चांदीने उसळी घेतली. 23 मे रोजी चांदी किलोमागे 3300 रुपयांनी आपटली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 72,826 रुपये, 23 कॅरेट 72,534 रुपये, 22 कॅरेट सोने 66,709 रुपये झाले. 18 कॅरेट 54,620 रुपये, 14 कॅरेट सोने 42,603 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,055 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंगची मागणी
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) प्रतिनिधींनी मंगळवारी BIS अधिकाऱ्यांची मुलाखत घेतली. या दरम्यान 9 कॅरेट सोन्यासाठी हॉलमार्किंग आणि HUID क्रमांकाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. ET ने दिलेल्या वृत्तानुसार, IBJA चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी वाढत्या किंमतींचा ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगितले. सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढत आहे. ग्राहकांच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे याविषयावर योग्य तो निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.