मार्च आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने नवनवीन रेकॉर्ड नावावर केले आणि मोडीत काढले. मार्च पेक्षा एप्रिल महिन्यात तर मौल्यवान धातूंनी सर्वकालीन विक्रम नोंदवले. ग्राहकांना इतक्या दरवाढीची अपेक्षा नव्हती. जागतिक बाजारातील घडामोड, भू-राजकीय तणाव, चीनमधील मध्यमवर्गाची सोने-चांदीची तुफान खरेदी आणि देशातील अंतर्गत धोरणं, रुपयांची घसरण या सर्व गोष्टींचा परिणाम बेशकिंमती धातूंच्या किंमतींवर दिसून आला. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 2015 मध्ये सोन्याचा भाव 24,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता सध्या हा भाव 24 कॅरेटसाठी 71,598 रुपये इतका आहे. 9 वर्षांत किंमती तिप्पट झाल्या. आता काय आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 25 April 2024)
घसरणीनंतर सोने महागले
गेल्या आठवड्यात सोने 2,000 रुपयांनी महागले आणि 430 रुपयांनी स्वस्त झाले होते. सोमवारी 22 एप्रिल रोजी सोने 550 रुपयांनी कमी झाले. मंगळवारी 1530 रुपयांनी सोने आपटले. बुधवारी हा भाव 450 रुपयांनी वधारला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी नरमली
गेल्या आठवड्यापासून चांदीत घसरणीचे सत्र आहे. 17 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली होती. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीच्या किंमतीत बदल झाला नाही. या आठवड्यात 22 एप्रिल रोजी चांदी 1 हजारांनी घसरली. 23 एप्रिल रोजी 2500 रुपयांनी चांदी दणकावून आपटली. बुधवारी पण किंमतीत नरमाई होती. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 82,900 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,826 रुपये, 23 कॅरेट 71,538 रुपये, 22 कॅरेट सोने 65,793 रुपये झाले. 18 कॅरेट 53,870 रुपये, 14 कॅरेट सोने 42,018 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 80,687 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
9 वर्षांचे गणित काय?
वर्ष 2015 मध्ये सोन्याचा भाव 24,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या किंमतींन तिप्पट होण्यासाठी 9 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यापूर्वी पण सोन्याच्या किंमती 9 वर्षांच्या कालावधीत तिप्पट झाल्या होत्या. वर्ष 2006 मध्ये सोन्याचा भाव 8,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमतींना तिप्पट होण्यासाठी जवळपास 19 वर्षे लागली होती. वर्ष 1987 मध्ये सोन्याचा भाव 2,570 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमती तिप्पट होण्यासाठी 8 वर्षे आणि 6 महिने लागले होते.