Gold Silver Rate Today : सोने-चांदी सूसाट! सराफा बाजाराला आनंदाचे भरते

| Updated on: Aug 25, 2023 | 9:39 AM

Gold Silver Rate Today : सोने-चांदी एकदम सूसाट सुटले आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दोन्ही धातूंना प्रेमाचे भरते आले आहे. या आठवड्यात दोन्ही धातूंनी मरगळ झटकली आहे. त्यामुळे सराफा बाजारात आनंदाचे भरते आले आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदी सूसाट! सराफा बाजाराला आनंदाचे भरते
Follow us on

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : अमेरिकन बाजारात सध्या घडामोडी घडत आहे. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची बैठक सुरु आहे. उद्या या बैठकीतील निर्णयाची घोषणा होईल. त्याआधारे व्याजदर वाढतील की नाही, हे उमगेल. पण बाजारातील संकेतांमुळे सध्या गुंतवणूकदारांनी सोने-चांदीकडे मोर्चा वळवला आहे. वैश्विक बाजारात दोन्ही धातूंनी गेल्या सहा आठवड्यातील उच्चांकी कामगिरी बजावली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदी चमकले होते. त्यानंतर सलग घसरणीचे सत्र सुरु होते. या आठवड्यात घसरणीच्या सत्राला ब्रेकच लागला नाही तर सोने-चांदीने (Gold-Silver Price Today 25 August 2023) उसळी पण घेतली आहे. दोन्ही धातूंचा मूड बदलला असून आठवड्याच्या शेवटी सुद्धा चढाईचा मुहूर्त हुकला नाही. जुलै महिन्यातील दरवाढीचा राग सध्या या आठवड्यात या धातूंनी आळवला आहे.

किंमती सूसाट

ऑगस्ट महिन्यात सोन्यात मोठी पडझड झाली. आता अखेरच्या टप्प्यात सोन्याने पडझड वसूलीचा जणू योजनाच आखली आहे. या आठवड्यात सोन्याने सूसाट धाव घेतली आहे. या महिन्यात सोन्यात 1, 5 ऑगस्ट नंतर या चार दिवसांत भाव वधारले. 21 ऑगस्ट रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची वाढ झाली. 23 ऑगस्ट रोजी भावात 180 रुपयांची वाढ झाली. 24 ऑगस्ट रोजी सोन्यात 200 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 54,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सने ही आकडेवारी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीने घेतली मोठी झेप

या महिन्याच्या सुरुवातीला चांदी घसरली. 16 ऑगस्ट रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला. भाव 200 रुपयांनी वाढले होते. 18 ऑगस्ट रोजी चांदीने 1000 रुपयांची चढाई केली. 19 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची घट झाली. 21 ऑगस्ट रोजी किंमतीत पुन्हा 200 रुपयांची वाढ झाली. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांची वाढ झाली. आता 23 ऑगस्ट रोजी किंमती पुन्हा 500 रुपयांनी वधारल्या. आता 24 ऑगस्ट रोजी चांदीने 1600 रुपयांची मोठी झेप घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,734 रुपये, 23 कॅरेट 58,499 रुपये, 22 कॅरेट सोने 53,800 रुपये, 18 कॅरेट 44051 रुपये, 14 कॅरेट सोने 34,359 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. सोन्याचे भाव 200 रुपयांनी वधारले. एक किलो चांदीचा भाव 73,667 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.