नवी दिल्ली | 29 डिसेंबर 2023 : सोने-चांदीचा आलेख उंचावला आहे. मौल्यवान धातूंनी किंमतीत मोठी आघाडी घेतली. दरवाढ झाल्याने ग्राहक हिरमुसले आहे. वर्षाच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदीत गुंतवणूक करण्याची काहींची संधी हिरावली आहे. तर ज्यांनी यापूर्वीच गुंतवणूक केली आहे. त्यांची मात्र चांदी झाली आहे. तर लग्नसराईत दागदागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आल्या पावली परत जाण्याची वेळ आली आहे. काही ग्राहक तर केवळ किंमती (Gold Silver Price Today 29 December 2023) विचारुन परत फिरत आहे. एका तोळ्यामागे बजेट वाढल्याने अनेकांनी काढता पाय घेतला. तर काही जण पर्याय नाही म्हणून खरेदी करत आहे. काय आहेत सोने-चांदीच्या किंमती?
किंमतीत वाढ का?
जागतिक बाजारातील घडामोडींचा प्रतिकूल परिणाम भारतीय बाजारात दिसून येत आहे. दिवाळीपासूनच सोने-चांदी वधारले आहे. जगभरात अचानक या मौल्यवान धातूची मागणी वाढली आहे. चीननंतर भारत हा सर्वात मोठा आयातदार आहे. चीन गेल्या एका वर्षापासून तांब्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. डॉलर मजबूत स्थितीत आहे. जगात दोन युद्ध सुरु आहे. या सर्व घडामोडींमुळे सोने-चांदीच्या किंमतींवर परिणाम दिसून येत आहे.
2700 रुपयांची भरारी
मागील दोन आठवड्यात सोन्याने 2700 रुपयांची भरारी घेतली. दहा दिवसांपूर्वी किंमतीत 1100 रुपयांची वाढ झाली तर गेल्या आठवड्यात किंमती 880 रुपयांनी वधारल्या. या आठवड्यात 700 रुपयांची उसळी आली. आठवड्याच्या सुरुवातीला किंमती स्थिर होत्या. 26 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी तर 27 डिसेंबर रोजी 100 रुपयांची दरवाढ झाली. 28 डिसेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 59,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत तुफान तेजी
गेल्या दोन आठवड्याचा विचार करता चांदीत 6100 रुपयांची दरवाढ झाली. या आठवड्यात 25 डिसेंबर रोजी चांदीत 200 तर 26 डिसेंबर रोजी 300 रुपयांची दरवाढ झाली. तर 27 डिसेंबर रोजी 300 रुपयांची घसरण झाली. 28 डिसेंबर रोजी 300 रुपयांची भाववाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 63,452 रुपये, 23 कॅरेट 63,198 रुपये, 22 कॅरेट सोने 58,122 रुपये झाले. 18 कॅरेट 47,589 रुपये, 14 कॅरेट सोने 37,119 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,633 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.