नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : सप्टेंबर महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये तर सोने-चांदीचे पानिपत झाले. किंमतीत विक्रमी घसरण झाली. आतापर्यंत नवनवीन रेकॉर्ड करणारे सोने आता थेट जमिनीवर आले आहे. त्यापाठोपाठ चांदीचा पण प्रवास सुरु झाला. दोन्ही धातूंनी घसरणीचा नवीन रेकॉर्ड तयार केला. यावर्षात, जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल या तीन महिन्यात सोने-चांदीने जोरदार मुसंडी मारत नवीन रेकॉर्ड तोडले होते. पण मध्यंतरीच्या काळात एका विशिष्ट किंमतीतच चढउतार सुरु होता. या दरम्यान दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आला नाही. पण आता सोने-चांदीचा उलटा प्रवास तर सुरु झाला नाही, अशी शंका तज्ज्ञांना येत आहे. डॉलर इंडेक्स जसा वधारेल, तशी ही तफावत अजून दिसून येईल. सोने-चांदीच्या (Gold Silver Rate Today 4 October 2023) नवीन दराने ग्राहकांच्या डोळ्यात चमक आली आहे. त्यांना सर्वोच्च किंमतीपेक्षा जवळपास पाच हजारांचा फायदा दिसून येत आहे.
सोने फिरले माघारी
गुडरिटर्न्सनुसार, गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्यात घसरण झाली होती. त्यानंतर 15 ते 19 सप्टेंबर या काळात तेजीचे सत्र आले. भाव वधारले. पुढे या किंमती उतरल्या. 29 सप्टेंबर रोजी सोने 250 रुपयांनी घसरले. 30 सप्टेंबर रोजी सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले. तर 1 ऑक्टोबर रोजी मोठा बदल झाला नाही. 2 ऑक्टोबर रोजी सोने 150 रुपयांनी घसरले. 3 ऑक्टोबर रोजी भावात जवळपास 650 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 52,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,530रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीचा उलटा प्रवास
सप्टेंबर महिन्यात चांदीत मोठी पडझड झाली होती. सुरुवातीच्या सत्रातच चांदी 5000 रुपयांनी स्वस्त झाली होती. 22 तारखेला 1 हजारांनी किंमती वधारल्या. 27 सप्टेंबर रोजी 600 तर 28 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी चांदी घसरली. 29 सप्टेंबर रोजी हजार रुपयांनी भाव वधारले. 30 सप्टेंबर रोजी चांदीत 1200 रुपयांची स्वस्ताई आली. 1 ऑक्टोबर रोजी भाव जैसे थे होते. 2 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. आता 3 ऑक्टोबर रोजी चांदी 2000 रुपयांनी उतरली आहे. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 71,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 56,675 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 56,488 रुपये, 22 कॅरेट सोने 51,914 रुपये, 18 कॅरेट 42,506 रुपये, 14 कॅरेट सोने 33,155 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 67,037 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.