नवी दिल्ली : सोने आणि चांदीने (Gold Silver Rate Today) आज पुन्हा जोरदार बॅटिंग केली. दोन्ही धातूंमध्ये दरवाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात सोन्याने विक्रमी चढाई केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून आजही दोन्ही धातूंना मोठी मागणी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारापासून (International Market) ते भारतीय बाजारपेठेपर्यंत किंमती धातूंना मोठी मागणी आली आहे. देशात सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे ही मागणी वाढली आहे. औद्योगिक कंपन्या आणि औषधी कंपन्यांमध्ये चांदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव सूसाट सुटले आहेत. येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव 60 हजारांचा टप्पा ओलांडेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. काही गुंतवणूकदारांनी 2018 पासूनच सोन्यात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यावेळी भाव 32,000 रुपयांच्या जवळपास होता.
वायदे बाजारात (Multi Commodity Exchange-MCX) आज सोन्याचा भाव 57,000 रुपयांच्या पुढे गेला. सोन्यात आज 154 रुपये वा 0.27 टक्क्यांची वाढ झाली. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57126 रुपये आहे. तर 56994 रुपयांपर्यंत घसरणही दिसून आली. तर 10 ग्रॅम सोन्याने 57134 रुपयांपर्यंत उसळी ही घेतली.
चांदी आज चमकली. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या किंमती घसरल्या होत्या. पण आता चांदी रुळावर आली आहे. वायदे बाजारात चांदीत 200 रुपयांची वृद्धी दिसून आली. 67650 रुपये प्रति किलोवर चांदी व्यापार करत होती. चांदीची खरेदी करणाऱ्यांनाही लवकरच लॉटरी लागू शकते.
आज चांदीचा सुरुवातीचा भाव 67399 रुपये होता. त्यानंतर हा यामध्ये 100 रुपयांहून अधिकची वाढ दिसून आली. किंमती 67479 रुपये प्रति किलोवर पोहचल्या तर चांदीने आज 67599 रुपये प्रति किलो उसळी घेतली.
भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.
अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते.
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.