चैत्राला सोने आणि चांदीने महागाईचे तोरण बांधले. दोन्ही मौल्यवान धातूची घौडदौड सुरुच आहे. दरवाढीची गुढी उभारल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. सोने आणि चांदीने एप्रिल महिन्यातच सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवले आहे. ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. या मौल्यवान धातूंनी इतकी मोठी झेप कशी घेतली हाच ग्राहकांसमोरचा यक्ष प्रश्न आहे. त्यामागे काही जागतिक कारणं आहेत. सर्वात मोठे कारण, भारतीय रुपयांचे अवमूल्यन हे आहे. डॉलरच्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरवाढीत दिसून येत आहे. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, एप्रिलच्या पहिल्या सहा दिवसांत सोने जवळपास 4,000 रुपयांनी तर चांदी 7,000 रुपयांनी वधारली. हा ग्राहकांसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 9 April 2024)
सोने 4,000 रुपयांनी महागले
चांदीने टाकला टॉप गिअर
एप्रिल महिन्यात चांदीच्या किंमती सूसाट आहे. एका आठवड्यात चांदी 7 हजारांनी वधारली. 1 एप्रिलला 600 रुपयांची दरवाढ झाली. 2 एप्रिल रोजी 400 रुपयांनी किंमती वधारल्या. 3 एप्रिलला चांदीने 2 हजारांची मुसंडी मारली. 4 एप्रिल रोजी एक हजारांनी किंमती वधारल्या. 5 एप्रिल रोजी किलोमागे 300 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 6 एप्रिल रोजी किलोमागे चांदीने 1800 रुपयांची उडी घेतली. तर 8 एप्रिल रोजी एक हजारांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपयांपर्यंत खाली आला.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 71,279 रुपये, 23 कॅरेट 70,994 रुपये, 22 कॅरेट सोने 65,292 रुपये झाले.18 कॅरेट 53,459 रुपये, 14 कॅरेट सोने 41,698 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,496 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
ही आहेत कारणं
सोने आणि चांदीने हनुमान उडी घेतली आहे. या दरवाढीने ग्राहकांना मोठे कोडे घातले आहे. किंमती इतक्या झटपट कशामुळे वाढल्या, याचा त्यांना प्रश्न पडला आहे. सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेच्या केंद्रीय बँक, युएस फेडने व्याजदरात कपात केली आहे. जगात दोन ठिकाणी युद्ध सुरु आहेत. भूराजकीय चिंता सर्वच देशांना सतावत आहे. चीनने चांदीची आक्रमकपणे खरेदी सुरु केलेली आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. तर भारतीय रुपयांचे अवमूल्यन हा मोठा घटक या दरवाढीला कारणीभूत ठरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांने नांग्या टाकल्याने चढ्या दराने मौल्यवान धातूची खरेदी करावी लागत आहे.