नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : पावसाने ओढ दिली असली तरी सराफा बाजारात सोने-चांदीने (Gold Silver Price Today) दरवाढीचे सत्र आरंभले आहे. सोने-चांदीचे दराने आगेकूच केली. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीवर दबाव होता. दोन्ही धातूंमध्ये मोठी पडझड झाली. सोने तर 58,000 रुपयांपर्यंत खाली आले. चांदीत पण मोठी घसरण झाली. या दोन्ही धातूंचे भाव आता अजून किती घसरतात, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत होती. पण जुलै महिन्यात दबाव झुगारुन सोने-चांदीने सर्वांचे अंदाज चीतपट केले. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याने दरवाढीचा धडाका लावला. तर चांदीने पुन्हा झेप घेतली. दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली. आता गुंतवणूकदारांना नवीन रेकॉर्ड होऊन कधी कमाईची लॉटरी लागते, याचे वेध लागेल आहेत.
सोने-चांदीची आगेकूच
जुलै महिना सोने-चांदीसाठी जोरदार ठरला. या 15 दिवसांत सोने-चांदीने गगन भरारी घेतली. दोन्ही धातूंच्या किंमती वधारल्या. पंधरा दिवसांत सोने जवळपास 1500 रुपयांनी वधारले. तर चांदीने 6000 रुपयांची उसळी घेतली. तरीही नवीन रेकॉर्ड करण्याचे बळ सोन्याला मिळत नसल्याचे चित्र आहे. चांदीची मात्र आगेकूच सुरु आहे.
काय आहे भाव
शनिवारपासून सोने-चांदीत मोठी वाढ झाली नाही. 17 जुलै रोजी किंमती 20 रुपयांनी घसरल्या. 22 कॅरेट सोने 55,130 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. 18 जुलै रोजी मोठी उलाढाल झाली नाही. तर 19 जुलै रोजी सकाळच्या सत्रात भाव वधारले. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 55,280 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,280 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वधारले.
चांदी वधारली
गुडरिटर्न्सनुसार, चांदी किलोमागे 6000 रुपयांपर्यंत वधारली. 5 जुलै रोजी 500, 6 जुलै रोजी 800, 8 जुलै रोजी 1000, मध्यंतरी 300, 13 जुलै रोजी 2000, 14 जुलै रोजी 1500 रुपये प्रति किलो किंमती वधारल्या. तर 18 जुलै रोजी किंमती 300 रुपयांनी वाढून 78,000 रुपये किलो झाल्या.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 59,440 रुपये, 23 कॅरेट 59,202 रुपये, 22 कॅरेट सोने 54,447 रुपये, 18 कॅरेट 44,580 रुपये, 14 कॅरेट सोने 34,772 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
हॉलमार्कनुसार कॅरेट
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.