नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Sarafa Market) बुधवारी सकाळी सोने आणि चांदीच्या भावात (Gold-Silver Rate) जोरदार वृद्धी दिसून आली. नवीन दरावर नजर फिरवली असता, 999 शुद्ध सोन्याने आज 53 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर 67 हजारांच्या पुढे गेला आहे. काल चांदीत चमक होती. तर सोन्याच्या दरात 8 रुपयांची घसरण झाली होती. सध्या सोन्यात कायम चढ-उतार होत आहे. चांदीच्या किंमती कायम वरचढ ठरत असून चांदी काही दिवसात 75 हजारी मनसबदार होणार असल्याचा अंदाज आहे.
अधिकृत संकेतस्थळ ibjarates.com च्या दाव्यानुसार, आज सकाळी 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याच्या भावात वाढ होऊन ते 54,244 रुपये झाले. तर 916 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,887 रुपये झाला. सोन्यात आज वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा फायदा झाला आहे.
तर, 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव वाढून 40,846 रुपयांवर पोहचला. तर 585 शुद्धतेचे सोने महागले. या सोन्याचा दर 31860 रुपये होता. 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 67,976 रुपये होता. कालपेक्षा सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
सोने-चांदीच्या भावात सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा बदल होतो. सकाळच्या दरानुसार, आज सकाळी 999 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 432 रुपयांनी, 995 शुद्धतेच्या सोन्याचा दर 430 रुपयांनी तर 916 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 396 रुपयांनी वाढला.
तर, 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 324 रुपयांनी तर 585 शुद्धतेच्या सोन्यात 253 रुपयांनी महागले. 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीच्या दरात आज 815 रुपयांची वाढ झाली. चांदीचा दर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी होणार आहे.
दरम्यान चीनची मध्यवर्ती बँक, पीपल्स बँक ऑफ चायनाने (People’s Bank Of China) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये देशात 32 टन सोने खरेदी करण्यात आले आहे. सप्टेंबर 2019 नंतर तीन वर्षांनी पहिल्यांदा चीनच्या सोने साठ्यात बदल झाला आहे.
जागतिक सोने परिषदेनुसार, (WGC) ताज्या आकड्यांआधारे चीनकडील सोन्याच्या साठ्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, चीनकडे 1,980 टन सोन्याचा साठा आहे. चीनने सध्या जे 32 टन सोन्याची खरेदी केली आहे, ते 1,650 डॉलर प्रति औसच्या दराने खरेदी केले आहे.