मुंबई : चालू आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात (Gold-silver rate) घसरण पहायला मिळाली. सोन्याच्या तुलनेत चांदी (silver) अधिक स्वस्त झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात चांदीचा भाव दीड हजारांनी कमी झाले. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सहा जूनला चांदीचे भाव 62,471 रुपये प्रति किलो इतके होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज चांदीचे दर प्रति किलो 60,881 रुपये प्रति किलो झाले आहेत. याचाच अर्थ आठवडाभरात चांदीच्या दरात 1,590 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास चालू आठवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा 232 रुपयांनी कमी झाले आहेत. सहा जून रोजी सोन्याचा दर प्रती तोळा 51,167 रुपये एवढा होता. आज सोन्याचा दर प्रति तोळा 50,935 रुपयांवर पोहोचला. दरम्यान पुढील काळात देखील सोन्याच्या दरात तेजी राहण्याची शक्यता कमीच आहे. एमके वेल्थ मॅनेजमेंटच्या रिपोर्टनुसार यंदा सोन्याचे दर प्रति तोळा 51,500 रुपयांच्या आसपासच राहण्याचा अंदाज आहे.
आरबीआयकडून चालू वर्षात दोनदा रेपो रेट वाढवण्यात आला आहे. चार मे रोजी रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. तर चालू महिन्यात रेपो रेट पुन्हा एकदा 50 बेसिस पॉईंटने वाढवण्यात आला आहे. नव्या वाढीसह आता आरबीआयचा रेपो रेट 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी रेपो रेट वाढवण्यात आल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. या रेपो रेट वाढीचा परिणाम हा सोन्याच्या दरावर देखील दिसत असून, सोन्याच्या भावात फारसा बदल झालेला नाही. सोन्याच्या किमती स्थिर आहेत. पुढील काळात देखील सोन्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता कमीच आहे.
येणाऱ्या काळात चांदीच्या दरात मोठी वाढ पहायला मिळू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्या चांदीचा दर प्रति किलो 60 हजारांच्या आसपास आहे. मात्र पुढील काळात चांदीच्या दरात मोठी भाववाढ होण्याची शक्यता आहे. चांदीचे दर प्रति किलो 83 हजारांच्या आसपास जाऊ शकतात असा अंदाज सराफा मार्केटमधून वर्तवण्यात येत आहे. अशा स्थितीमध्ये सोन्यापेक्षा चांदीमध्ये केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर राहण्याची शक्यता आहे.