बाजारात महागाईने (Inflation) कहर केला आहे आणि सर्वसामान्यांना घाम फुटला आहे. बचत तर सोडाच आहे त्या कमाईत (Income) घर खर्च आणि इतर खर्च भागवण्याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यातच आता पॅकेटबंद दही आणि लस्सीची चव ही बेचव झाली आहे. जीएसटी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या दोन्ही पदार्थांवरची जीएसटी सवलतीची सूट मागे घेऊन दही, लस्सी आणि ताक (Yogurt, lassi and buttermilk) जीएसटीअंतर्गत (Under GST) आणण्याची घोषणा झाली आहे. जर शिफारस मान्य झाली तर पॅकेटबंद दहीदुभते महाग होईल आणि ग्राहकांच्या खिश्यावर जास्त भार पडेल. परंतू या नुकसानीतही एक संधी दडलेली आहे. शेअर बाजारातून (Share Market) ही संधी मिळू शकते. काय आहे ही संधी? ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने (ICICI Securities) ही संधी शोधून काढली आहे. चला तर काय आहे ती संधी जाणून घेऊयात.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात जीएसटी परिषदेची 47 वी बैठक झाली. बैठकीत जीएसटी परीषदेत नव्याने काही खाद्य पदार्थांवर वस्तू आणि सेवा कर लावण्याचा निर्णय घेतला. ज्या वस्तूंवर आतापर्यंत जीएसटी लागू नव्हता, त्या वस्तूंवर जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली. यामध्ये दही, लस्सी आणि ताक यांचा समावेश झाला. पॅकेटबंद आणि लेबल लावलेल्या या पदार्थांची विक्री आता जीएसटीसह करण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम डेअरी उत्पादक कंपन्यांवर पडेल आणि त्यांनी भाव वाढवल्यावर त्याचा परिणाम ग्राहकांवर पडणार आहे. आतापर्यंत अनेक खाद्यपदार्थ आणि अन्नधान्याच्या वस्तू जीएसटीच्या परीघाबाहेर ठेवण्यात आल्या होत्या. पण ब्रँडेड उत्पादकांच्या याच वस्तू जीएसटी अंतर्गत आणण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली आहे. सरकारने ही शिफारस मान्य केल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिश्यावर होणार आहे.
ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्योरिटीजने याविषयीचा संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार दही आणि लस्सीवर 5 टक्क्यांपर्यंत जीएसटी लागू होऊ शकतो. सध्या या खाद्यपदार्थांवर कोणतेही शुल्क लागू करण्यात आलेले नाही. सध्या महागाईचा विचार करता दूध खरेदी आणि जीएसटीचे 5 टक्के शुल्क गृहीत धरता दूध उत्पादकांना खर्च काढण्यासाठी या वस्तूंच्या किंमती वाढवण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. या वस्तूंच्या किंमतीत 2 ते 3 टक्के वाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दही, लस्सी आणि ताकाच्या किंमती वाढणार असल्या तरी हे पदार्थ तयार करणा-या कंपन्यांचे शेअर ही वधरण्याचा अंदाज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने वर्तवला आहे. ब्रोकरेज फर्मने हेरिटेज(Heritage), डोडला (Dodla) या कंपन्यांकडून शेअर खरेदीसाठी अनुकूलता दर्शवली आहे. तर हॅटसन अॅग्रो प्रोडक्ट (Hatsun Agro Products) आणि पराग मिल्क फूड्स(Parag Milk Foods) यांचे शेअर न विक्री करण्याचा सल्ला दिला आहे.