पोस्ट खात्याच्या अल्पबचत योजनांमध्ये(Post Office Small Saving Scheme) गुंतवणूक करणा-या गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आता जबरदस्त परतावा मिळेल. गोपीनाथ समितीने (Gopinath Committee) 2011 मध्ये शिफारस केली होती की, अशा अल्पबचत योजनांचे व्याजदर सरकारी रोख्यांच्या उत्पन्नापेक्षा (Government Bond Yield) 25 ते 100 बेसिस पॉइंट्सने जास्त असावेत. रोखे उत्पनाचा त्यासाठी आधार देण्यात आला होता. सध्या रोख्यातील उत्पन्नात 140 आधार अंकांची वाढ झाली आहे. वाढती महागाई आणि बँकांचे व्याजदर वाढत असल्याने रोख्यातील उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम आता अल्पबचत योजनांमध्येही दिसून येणार आहे. या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर व्याजदर वाढवण्यात येतील, असे मानण्यात येत आहे. परिणामी या योजनेत गुंतवणूक करणा-यांचा मोठा फायदा होणार आहे. सरकार लवकरच व्याजदर वाढीची भेट देऊ शकते. त्यामुळे 1 जुलै नंतर या योजनेतील गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळणार आहे.
2011 मध्ये गोपीनाथ समितीने याविषयीचे सूत्र मांडले. त्यानुसार अल्पबचत योजनांमधील बचतीचा व्याजदर हा त्या कालावधीच्या सरकारी रोख्यांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा 25-100 बेसिस पॉइंट्स जास्त असावेत. बेंचमार्क 10-वर्षीय रोखे उत्पन्न गेल्या 12 महिन्यांत 6.04% वरून 7.46% वर 140 आधार अंकांनी वाढले आहे. एप्रिल-जून तिमाहीत त्याची सरासरी 7.31% आहे. या आधारावर, सूत्रानुसार, PPF दर 7.81% पर्यंत वाढवला पाहिजे, तर सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samriddhi Yojana) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSY) 8% पेक्षा जास्त व्याजदर सरकारने दिला पाहिजे.
सध्या NSC म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 6.8 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक कर बचत योजनेवर 7.4 टक्के व्याज मिळत आहे.सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) 7.1 टक्के वार्षिक व्याज दर मिळते, किसान विकास पत्रावर (KVP) 6.9 टक्के व्याज मिळत आहे. एक वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्के व्याजदर, एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.5-6.7 टक्के व्याजदर आणि पाच वर्षांच्या ठेव योजनेवर 5.8 टक्के व्याज दर मिळत आहे. 2020-21 वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून अल्प बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
आता सरकारी रोखे उत्पन्न लक्षणीय वाढले आहे. सरकार लहान बचत दर वाढवू शकते. गोपीनाथ समितीच्या फॉर्म्युल्यानुसार ही दरवाढ करणार का, हा निर्णय अद्याप झालेला नसला तरी तो लवकरच होण्याची शक्यता आहे. अल्पबचत योजनांमधील बचतीचा व्याजदर हा त्या कालावधीच्या सरकारी रोख्यांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा 25-100 बेसिस पॉइंट्स जास्त असावेत, या सूत्राची सरकार कधी अंमलबजावणी करते हे लवकरच कळेल.