नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : मिठाईपासून शेवपर्यंत अनेक पदार्थ घराघरात बाजारातून येतातच. त्यात हल्दीराम या नागपूरच्या ब्रँडचा (Nagpur Haldiram Brand) वरचष्मा दिसून येतो. देशातील मिठाई, नमकीन बाजारावर ही कंपनी अधिराज्य गाजवत आहे. टाटा कंझ्युमर (Tata Consumer) ही कंपनी खरेदी करण्याच्या बातमीने काल सर्वांच्याच नजरा उंचावल्या. दिवसभर हीच चर्चा रंगली, शेवटी टाटा कंझ्युमरने या वृ्ताचे खंडण केले. पण या ब्रँडच्या चर्चा थांबल्या नाहीत. राजस्थानमधील बिकानेर येथील एका छोट्या दुकानातून सुरु झालेला हा या कंपनीचा प्रवास आज जागतिक नकाशावर पोहचला आहे. मुळात या ब्रँडच्या संस्थापकाच्या हाताला चव होती. चवीची परंपरा आजगायत कायम आहे. त्यामुळेच हल्दीराम लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. कधीकाळी अगदी छोट्या जागेतून सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यवधींची उलाढाल करतो.
अशी झाली सुरुवात
गंगा भिसेन अग्रवाल यांनी 1937 साली हल्दीरामचा श्रीगणेशा केला. गंगा यांना त्यांची आई लाडाने हल्दीराम म्हणायची. त्यांचा जन्म बिकानेरमधील एका मारवाडी कुटुंबात झाला होता. सुरुवातीला हल्दीराम एका हॉटेलमध्ये काम करायचे. तर काकीच्या हातचा भुजिया शेवची विक्री करायचे. त्यानंतर कौटुंबिक कलहातून त्यांनी पत्नी चंपा देवीला सोबत घेत घर सोडले. 1946 साली हल्दीराम यांनी बिकानेर येथे स्वतःची दुकान सुरु केली. याठिकाणी त्यांनी बीकानेरी भुजिया विक्री सुरु केली. त्यानंतर अनेक खाद्यपदार्थांची विक्री सुरु केली. बारीक शेव ही त्यांची खासियत. त्यामुळे त्यांच्या विक्रीने जोर पकडला. हल्दीराम कोलकत्याला एका लग्नसाठी गेले. त्याठिकाणी त्यांना दुसऱ्या शहरात पण दुकान उघडण्याची कल्पना सुचली. देशभर हल्दीराम पोहचला.
अनेक ठिकाणी विस्तार
हल्दीराम यांचे नातू शिव किशन अग्रवाल यांनी 1985 मध्ये कंपनीचा विस्तार सुरु केला. सध्या हल्दीराम 70 प्रकारचे विविध नमकीन पदार्थ, मिठाई, रिफ्रेशमेंट ड्रिंक्सची विक्री करते. कंपनीचे नागपूर, नवी दिल्ली, कोलकत्ता आणि बिकानेरमध्ये उत्पादन युनिट आहेत. नागपूर आणि दिल्लीत कंपनीचे रिटेल चेन स्टोअर आणि रेस्टॉरंट आहेत.
परदेशात पोहचला ब्रँड
हल्दीरामचे पदार्थ अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान, थायलंड, श्रीलंकेसह इतर अनेक देशात विक्री होतात. देशातच नाही तर हल्दीरामचे पदार्थ जगातील 50 हून अधिक देशांमध्ये विक्री होत आहे. परदेशातील सुपर मार्केटमध्ये पण हे प्रोडक्ट्स सहज मिळतात. 2019 मध्ये हल्दीरामची वार्षीक कमाई 7,130 कोटी रुपये होती. हा ब्रँड 3 अब्ज डॉलरच्या घरात पोहचला आहे.