नवी दिल्ली : जर तुमच्या नावावर इतर कोणी परस्पर कर्ज (Loan) काढले तर? हा प्रकार धक्कादायक तर आहेच पण यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटका ही बसू शकतो. तुम्हाला अंधारात ठेवत हा प्रकार होत असेल तर सावध रहा. ही फसवणूक तुम्हाला खड्यात घालू शकते. अनेक सायबर भामट्यांनी पॅन कार्डचे क्लोनिंग (Pan Card Cloning) करुन दुसऱ्याच्या नावे अनेक बँकेतून कर्ज उचलून पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वच कागदपत्रे तुमच्या नावावर असल्याने तुम्हाला बचावाची संधीही कमी असते. अशावेळी बँक खात्याबाबत (Bank Account) जागरुक असणे आवश्यक आहे. अनेकदा ग्राहक खात्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे सायबर भामट्यांचे (Cyber criminals) फावते. ते ग्राहकाच्या नावाने कर्ज काढतात.
सायबर गुन्हेगार तुमची आयुष्यभराची कमाई एका झटक्यात उडवितात. त्यासाठी अनेक क्लृप्त्या आखतात. अनेक ट्रिक्स वापरतात. सायबर भामट्यांना आता आणखी नवीन प्रकार शोधला आहे. त्यामध्ये कर्ज फसवणूक हा एक नवीन प्रकार त्यांनी शोधला आहे. यासारखी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. फसवणुकीच्या या प्रकरणामुळे अनेकांची झोप उडाली आहे.
अशा प्रकरणात सायबर भामटे खातेदारांच्या नावावर कर्ज घेऊन मोकळे होतात. याची माहिती खातेदारांनाही होत नाही. जोपर्यंत त्यांना ही माहिती मिळते, तोपर्यंत मोठा उशीर झालेला असतो. ग्राहकाच्या नावावर मोठे व्याज होते आणि मोठी कर्ज रक्कम त्याच्या अंगाशी येते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एखादी व्यक्ती आपल्या परवानगीशिवाय, आपल्या पाठीमागे बँक कर्ज तरी कसे मंजूर करते. या कर्जाची आपल्याला काहीच कशी कल्पना येत नाही. आपल्या मोबाईलवर यासंबंधीची कोणतीही माहिती का येत नाही? हे काय गौडबंगाल आहे, असे एक ना अनेक प्रश्नांची जंत्री आपल्यासमोर येते. तसेच अशा फसवणुकीच्या प्रकरणापासून आपण कसे वाचावे, याचाही आपण उपाय शोधतो.
सायबर भामटे तुम्हाला जे प्रश्न पडले, त्याचाचा वापर करुन सायबर भामटे फसवणूक करतात. त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्डचा वापर केल्या जातो. आरोपी ग्राहकांच्या नावावर छोटे-छोटे कर्ज घेतात. त्यासाठी व्हेरिफिकेशनची झंझट नसते. इन्स्टेट कर्ज अॅप्सच्या माध्यमातून हा प्रकार होतो. सायबर गुन्हेगार याचाच वापर करतात. तुमच्या पॅनकार्डचे क्लोनिंग करुन, मोबाईल क्रमांकचे क्लोनिंग करुन मोठे कर्ज उचलल्याचे प्रकारही उघड झाले आहेत.
अनेकदा आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड कोणत्याही कामासाठी द्यावे लागते. नेमका याचाच फायदा सायबर गुन्हेगार उचलतात. त्यामुळे वारंवार CIBIL स्कोअर चेक करत रहा. सिबीलच्या यादीत तुमचे नाव असते. तसेच तुमच्या आर्थिक घडामोडींची संपूर्ण जंत्रीच समोर येते. यामाध्यमातून तुम्हाला कळते की तुमच्या नावावर किती कर्ज आहे. जर एखादे कर्ज तुमच्या नावावर घेण्यात आले असेल तर त्याची माहिती तुम्हाला मिळते. त्या कर्जाची परतफेड न झाल्याने सिबील स्कोअर कमी होतो.
जागरुकता हीच सर्वात मोठी सुरक्षितता आहे. क्रेडिट रिपोर्टमध्ये काही गडबडी दिसल्यास तुम्हाला त्याची माहिती मिळते. कर्ज तुम्ही घेतले नसेल तर संबंधित बँकेत जाऊन तुम्ही तक्रार देऊ शकता. सायबर शाखेकडे त्याची तक्रार करु शकता. कोणत्याही कामासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड देण्याची गरज असेल तर त्यावर कोणत्या कामासाठी कागदपत्रे देण्यात येत आहे, त्याचा उल्लेख करा.