मुंबई, HDFC बँकेने त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात 50 बेस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे. यामुळे कंपनीच्या गृहकर्जाचा ईएमआय वाढणार आहे. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. देशातील सर्वात मोठ्या हाऊसिंग फायनान्स कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, HDFC ने गृहकर्जावर (Home Loan) रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) वाढवला आहे, ज्यावर त्याचे ॲडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) बेंचमार्क आहे. कंपनीने सांगितले की त्यांनी 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे, जी 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल.
एचडीएफसीने गेल्या पाच महिन्यांत सातव्यांदा कर्जदरात वाढ केली आहे. आरबीआयने शुक्रवारी मुख्य धोरण दर 50 बेसिस प्वॉइंट्स वाढवल्यानंतर, इतर बँका आणि वित्तीय संस्थां देखील त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे अपेक्षित होतेच.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) रेपो दर 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. एप्रिल 2019 नंतरचा हा या दराचा उच्चांक आहे. या समितीमध्ये आरबीआयचे तीन सदस्य आणि तीन बाह्य तज्ज्ञांचा समावेश आहे. सहापैकी पाच सदस्यांनी दरवाढीच्या बाजूने मतदान केले.
ऑगस्टमध्ये महागाई 7 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने मध्यवर्ती बँक दरांबाबत कठोर भूमिका घेतील अशी अटकळ बांधली जात होती. यापूर्वी फेडरल रिझर्व्हनेही व्याजदरात झपाट्याने वाढ केली होती. त्यानंतर जगभरातील केंद्रीय बँकांनीही ठोस पाऊले उचलली.
गव्हर्नरच्या म्हणण्यानुसार, या पावलांमुळे आगामी काळात महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे आणि दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च दरम्यान महागाईचा दर 6 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, जो सध्या 7 टक्क्यांच्या पातळीवर आहे. रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे की जानेवारी ते मार्च दरम्यान महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या समाधानकारक मर्यादेत येईल.