मुंबई : खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या HDFC या बँकेने फिक्स डिपॉझिट (FD) च्या व्याज दरात मोठी घट केली आहे. HDFC बँकेने 2 कोटींपेक्षा कमी रकमेची गुतंवणूक करणाऱ्या FD च्या व्याजदरात बदल केले आहेत. यामुळे HDFC च्या ग्राहकांना मोठा झटका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल 22 जुलैपासून हे नवे व्याजदर लागूही करण्यात आलेत.
HDFC बँक 7 दिवसांपासून 10 वर्षापर्यंतच्या विविध FD वर दर वर्षाला 3.50 टक्क्यांपासून 7.30 टक्क्यांपर्यंत व्याज देते. मात्र नुकतंच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने रेपो रेटमध्ये घट केली आहे. यामुळे अनेक बँकानी व्याजदरात बदल केलेत. त्यात HDFC बँकेच्या FD चाही समावेश आहे. त्यानुसार HDFC बँकेने 30 दिवसानंतरच्या FD च्या व्याजदरात घट केली आहे.
बँकेच्या वेबसाईटनुसार, HDFC ने 30 दिवसांपासून 6 महिन्यांपर्यंत आणि 6 महिन्यांपासून 1 वर्षापर्यंतच्या सर्व FD च्या व्याज दर बदलले आहेत. त्याशिवाय लाँग टर्म टॅक्स सेविंग एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरातही बदल केले आहेत.
सर्वसामान्य लोकांना 22 जुलैपूर्वी HDFC बँकेच्या 30 दिवसांपासून 45 दिवसांच्या FD वर 5.75 टक्के व्याजदर मिळत होता. मात्र आता यात घट करत तो व्याजदर 5.50 टक्के करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या FD व्याजदरातही घट
त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना 30 दिवसांपासून 45 दिवसांच्या FD वर 6.25 टक्के व्याज दिला जात होता. मात्र आता हाच ज्येष्ठ नागरिकांना 6 टक्के व्याज दिला जाणार आहे. विशेष म्हणजे 46 दिवसानंतर 6 महिन्यापर्यंतच्या FD वरील 6.25 टक्के व्याज दर होता. मात्र त्यातही 0.25 टक्क्यांनी घट करत तो 6 टक्के करण्यात आला आहे.
इतकंच नाही तर एक वर्षापर्यंतच्या FD वरील व्याजदरात 0.20 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा व्याजदर 7.10 टक्के झाला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना दरवेळी 0.50 टक्के अधिक व्याज मिळतो. मात्र आता यात 1 वर्षापासून 2 वर्षापर्यंतच्या FD वर व्याजदरात घट करण्यात आली आहे. आता या व्याजदर 7.30 वरुन 7.20 टक्के करण्यात आला आहे.
7 दिवसांपासून 29 दिवसांपर्यंत FD व्याजदरात बदल नाही
दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे 7 दिवसांपासून 29 दिवसांपर्यंत FD च्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना या कालावधीतील व्याजदर पूर्वीप्रमाणे 4.25 टक्के ठेवला आहे.