नवी दिल्ली : फोर्ब्जने जगातील अब्जोपतींची साल 2023 ची नवीन ताजी यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय श्रीमंत उद्योगपतींमध्ये पहिल्या क्रमांकावर अर्थातच रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे स्थान कायम आहे. यंदा या यादीत नविन अब्जाधीशांमध्ये युवा अब्जाधीश म्हणून शेअर ब्रोकर फर्म जेरोधाचे सह संस्थापक निखिल कामथ यांचे नाव सामिल झाले आहे. फोर्ब्जच्या यादीतील ते सर्वात कमी वयाचे अब्जाधीश बनले आहेत. केवळ आठ हजाराची नोकरी ते सर्वात तरूण श्रीमंत उद्योजक हा त्यांचा प्रवास अनोखा आहे.
36 व्या वर्षी भूषविले पद
फोर्ब्जच्या यादीत यंदा भारताचे सर्वात तरूण अब्जाधीश म्हणून जेरोधाचे निखिल कामथ यांचे नाव सामिल झाले आहे. बंगळुरू शहराचे निवासी असलेल्या कामत बंधूंची एकूण मालमत्ता अनुक्रमे 1.1 अब्ज डॉलर आणि 2.7 अब्ज डॉलर आहे. एक शाळेतून ड्रॉपआऊट्स ते अब्जोपती पर्यंतचा निखिल याचा प्रवास रंजक आहे. जेरोधाच्या को – फाऊंडरने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांची कंपनी सध्या देशातीस सर्वात वेगाने वाढणारी स्टॉक ब्रोकींग कंपनी ठरली आहे.
कॉल सेंटरमध्ये केली होती पहिली नोकरी
निखिल कामत यांनी Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत आपली रंजक कहाणी सांगितली आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी नोकरी करायला सुरूवात केली होती. त्यांची पहिली नोकरी एका कॉल सेंटरमध्ये होती. तेथे त्यांना केवळ आठ हजार रुपये पगार होता. त्यानंतर त्यांचा श्रीमंत होण्याचा प्रवास शेअर मार्केट ट्रेडींग पासून सुरू झाला. निखिल कामत यांच्या मते त्यांनी जेव्हा शेअर ट्रेडींग सुरू केले तेव्हा ते फारसे गंभीर नव्हते. परंतू एक वर्षांनंतर त्यांना शेअर बाजारातील गणितं समजली. मंग त्यांनी नीट लक्ष देत व्यावसायिक पणे शेअर ट्रेडींग सुरू केले. त्यानंतर त्यांनी कधी मागे पाहिलेच नाही. त्यांची संपत्ती वेगाने वाढत गेली. आज ते देशातील सर्वात युवा अब्जाधीश म्हणून पुढे आले आहेत.
वडीलांनी दाखविला विश्वास
निखिल यांना त्यांच्या वडीलांनी एकदा त्यांच्या काही सेव्हींग्स त्यांच्याकडे सोपवित त्यांची योग्य गुंतवणूक करण्यास सांगितले. हा त्यांचा शेअरबाजारातील पहिला प्रवेश होता. ते म्हणाले वडीलांनी आपल्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला. त्यानंतर हळूहळू आपण बाजारावर पकड मिळविली. त्यानंतर चांगली कमाई होऊ लागल्यावर नोकरीवर जाणे बंद केले.
जेरोधाची सुरुवात अशी झाली
नोकरी सोडल्यावर आपला मोठा भाऊ नितीन कामथ बरोबर कामथ असोसिएट्स सुरू केली. त्यानंतर शेअर ट्रेडींग सुरू केले. त्यानंतर साल 2010 मध्ये दोघांनी जरोधा स्थापना केली. आपण स्ट्रगलमधून खूप काही शिकलो आहोत. आजही मी दिवसातील 85 टक्के वेळ कामच करीत असतो. मला हे सर्व गमवायचे नाही असे त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे.