सर्दी-पडसे, ताप, अंग दुखीवेळी आपण थेट मेडिकलमध्ये जाऊन गोळी अथवा औषध आणतो. त्यातील मात्रा, रसायनं याच्याशी आपल्याला काही ऐक देणे घेणे नसते. त्वरीत आराम पडावा, हीच त्यावेळची गरज असते. पण यातील अनेक औषधं आता मेडिकलमध्ये यानंतर विक्री करता येणार नाही. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देशात 150 हून अधिक औषधांवर बंदी घातली आहे. तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशीनंतर या औषधांवर बंदी घालण्याचे पाऊल टाकण्यात आले आहे. ही औषधं नागरिकांच्या आरोग्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तात्काळ प्रभावाने बंदीची अंमलबजावणी
ही औषधं तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याविषयीची सूचना काढण्यात आली आहे. सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 च्या कलम 26A अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, या औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी तात्काळ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे औषध विक्री दुकानांवर ही औषधं विक्री करता येणार नाही.
या औषधांवर घातली बंदी
सर्दी-पडसे, ताप आणि अंगदुखीसाठी या औषधांचा वापर करण्यात येतो. त्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये 150 हून अधिक औषधांचा समावेश आहे. यामध्ये एसिक्लोफेनाक 50एमजी + पॅरासिटामोल 125एमजी कॉम्बिनेशन या नावाच्या औषधांचा समावेश आहे. याशिवाय मेफेनामिक ॲसिड + पॅरासिटामोल इंजिक्शेन, सेट्रीजीन एचसीएल + पॅरासिटामोल + फेनिलफ्रीन एचसीएल, लेवोसेट्रीजीन + फेनिलफ्रीन एचसीएल + पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरामाइन मॅलेट + फेनिल प्रोपेनोलामाईन, आणि कॅमिलोफिन डाइहाइड्रोक्लोराइड 25एमजी + पॅरासिटामोल 300एमजी या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.
या पेनकिलरच्या विक्रीला बंदी
आरोग्य मंत्रालयाने पॅरासिटामोल, ट्रामाडोल, टॉरिन आणि कॅफीन यांच्या संयुक्त औषधांवर बंदी आणली आहे. त्याचा वापर सातत्याने पेनकिलर म्हणजे अंगदुखी कमी करण्यासाठी करण्यात येतो. ट्रामाडोल ओपियॉईड बेस्ड पेनकिलर मानण्यात येते, त्यावर पण आरोग्य खात्याने बंदीचा आदेश लागू केला आहे.
बंदीचे कारण तरी काय?
ही औषधं विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामागे तज्ज्ञांच्या समितीने काही दिवसांपासून त्यातील रसायनांचं प्रमाण, त्यातील घटक, त्यांचे प्रमाण याचा अभ्यास केला. तेव्हा ही औषधं कोणत्याही चाचणीशिवाय, घटकांचे प्रमाण, मात्रा न तपासता, थेट बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर समितीने ही औषधं बंदी घालण्याची शिफारस आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. यापूर्वी केंद्र सरकारने मार्च 2016 मध्ये 344 कॉम्बिनेशन ड्रग्स आणि जून 2023 मध्ये 14 औषधांवर बंदी घालण्यात आली होती.