नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) संकटातून जगासह भारत कसाबसा बाहेर पडला. भारताने झपाट्याने गती पकडली आहे. पण या गतीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. नैसर्गिक संकटं एकामागून एक येत आहेत. त्यामुळे शेतीचे (Farming) अपरिमीत नुकसान (Rain Damage) होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना लवकरच बसण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्यात बेमौसमी पावसाने अनेक राज्यात थैमान घातले आहे. यंदा पावसाचा मुक्काम लांबलाच नाही तर धुवाधार पावसाने शेतीचे आणि पिकांचं मोठं नुकसान केले आहे. शेतात गुडघा गुडघा पाणी तुंबलं आहे. पाण्याचा निचारा न झाल्याने जमीन चिभडली आहे. पीके जळून गेली आहे. अति पावसाने हातचे पीकही गेले आहे.
काही राज्यात पीक हातातोंडाशी आले होते. यंदा पाऊस दमदार झाला. त्यामुळे पीके जोमाने आली होती. तर गव्हाचे उत्पादन यंदा कमी होणार असल्याने गव्हाची निर्यात थांबविण्यात आली आहे. दरम्यान इतर पीकांचे उत्पादन चांगले होईल असा अंदाज होता. परंतु पावसाने या अंदाजावर पाणी फेरले.
ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसांत दिल्लीत नेहमीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. अशीच परिस्थिती उत्तर प्रदेश राज्याचीही आहे. हरियाणा राज्यात सरासरीपेक्षा 7 पट अधिक पाऊस झाला आहे. राजस्थान 5 पट, मध्यप्रदेशात 3 पट जास्त पाऊस झाला आहे. तर संपूर्ण देशात सरासरीपेक्षा 67 टक्के अधिक पाऊस पडला आहे.
या दिवसात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पीकाची कापणी करताच आली नाही. अवकाळी पावसाने शेतात पीके उभीच राहिली. काही ठिकाणी सोयाबीन शेतात झोपल्यामुळे पुन्हा अंकुर फुटले आहेत. तर काही ठिकाणी पीके जोरदार पावसाने वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. पिकांचे उत्पादन घसरले आहे. कमी उत्पादनामुळे अन्नधान्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. या तुटवड्यामुळे येत्या काही दिवसात अन्नधान्याचे भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.