नवी दिल्ली : देशात दुधाच्या किंमती (Milk Hike) सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दुधावरचा खर्च ही आता परवडत नाही. दुधाचे दर गगनाला भिडल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. वाढत्या महागाईने दूध ही ते फुंकून फुंकून पित आहेत. तर काहींनी दूधाचा वापरच थांबविला आहे. त्यांनी दुधालाच पर्याय शोधला आहे. याविषयीचा एक सर्वेक्षण (Survey) समोर आले आहे. त्यातील सत्य विदारक असले तरी बदलत्या काळानुसार गरीब आणि मध्यमवर्गाला जगावेच लागते. काहींनी पर्याय शोधले तर काहींनी दूध घेणे बंद केले आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अंतर्गत येणाऱ्या अमूल कंपनीने दुधाचे दर (Milk Prices) पुन्हा वाढविले. 3 फेब्रुवारी रोजी त्यांनी दुधाच्या किंमतीत वाढ केली. सर्व प्रकारच्या दुधाच्या किंमती 3 रुपयांनी वाढविल्या. गेल्या शुक्रवारी त्यांनी नवीन दरांची घोषणा केली.
दुधच नाही तर दुधापासून तयार होणारी उत्पादनेही महागली आहेत. त्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. दुधापासून तयार होणारे पदार्थ जसे दही, तूप, पनिर या सर्वांच्या भावात अचानक वाढ झाली आहे. ही भाव वाढ इतक्या झपाट्याने झाली आहे की, लोकांना धक्का बसला आहे. या महागाईला कसे तोंड द्यायचे या विचारात लोक पडले आहेत.
अशा परिस्थितीत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात महागाई वाढल्यानंतर ही दूध आणि दुधाच्या पर्यायांचा वापर होत आहे का? या शोध घेण्यात आला. या सर्वेक्षणात दूध आणि दुधाच्या उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. वाढत्या महागाईमुळे लोकांनी दुधाला पर्याय शोधणे सुरु केल्याचे समोर आले.
सर्वेनुसार, प्रत्येक 10 कुटुंबामागील 4 कुटुंबांनी दुधाचा वापर कमी केल्याचे दिसून आले. घरी दूध आणण्याचे प्रमाण घटले. त्यापेक्षा स्वस्त पर्याय शोधण्यात येत आहे.काही लोकांनी तर दूध आणि दुधाच्या पदार्थांवर बहिष्काराचे अस्त्र चालविले आहे. लोकलसर्किल्स यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले.
लोकलसर्किल्सच्या सर्वेक्षणात देशातील 303 जिल्ह्यांमधील 10,000 हून अधिक कुटुंबांनी सहभाग घेतला. या सर्वेक्षणात दूध, त्याचे पदार्थ आणि त्याच्या वाढत्या किंमती याबाबत लोकांची मते जाणून घेण्यात आली. त्यावेळी धक्कादायक बाबी समोर आल्या. दुधाचा वापरच बंद झाल्याचे सर्वेक्षणात समोर आले.
दुधाच्या वाढत्या किंमतींमुळे ऑगस्ट 2022 मध्ये 4 टक्के लोकांनी स्वस्त पर्यांयाचा शोध घेतला. फेब्रुवारी 2023 मध्ये ही संख्या वाढून 16 टक्के झाली. या सर्वेक्षणानुसार, 19 टक्के कुटुंबांनी दुधाचा वापर कमी केला आहे. तर 3 टक्के कुटुंबांनी दुधाला रामराम ठोकला आहे.
दुधाच्या वाढत्या दराला कंटाळून जनतेने सरकारने या किंमतीत लागलीच हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सातत्याने दरवाढ होत असल्याची नाराजी या सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरत आहे.
सहकारी असो वा खासगी सर्वच दूध उत्पादकांनी दुधाच्या भावात प्रचंड वाढ केली आहे. प्रत्येक वेळी 1-3 रुपयांची वाढ करण्यात येत आहे. देशातील लोकप्रिय ब्रँड असो वा गाव खेड्यातील दूध उत्पादक संघ सर्वांनीच भाव वाढविले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील भावात आता तफावत दिसून येत नाही.