देशातील घरगुती शेअर बाजार सध्या तेजीच्या हिंदोळ्यावर स्वार आहे. तो ऐतिहासिक उंच भरारीचा साक्षीदार झाला आहे. या आठवड्यात एका पाठोपाठ एक नवनवीन रेकॉर्ड शेअर बाजाराने नावावर नोंदवले आहे. एका महिन्यात सेन्सेक्सने 10 हजार अंकांची जबरदस्त उसळी घेतली आहे. या विक्रमी बुल रनमुळे गुंतवणूकदारांनी नोटा छापल्या आहेत. या बुल रन अर्थात सर्वांनाच खूष ठेवत नसल्याचे दिसून येते. काही लोक या कमाल घौडदौडीमुळे भयभीत झाले आहेत. बाजारातील अनेक तज्ज्ञांसाठी ही तेजी भीतीपेक्षा कमी नाही. त्यांनी याविषयी साशंकता पण व्यक्त केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी पण शेअर बाजाराच्या या तडाखेबंद खेळीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सेबीसह इतर संस्थांना असा सल्ला दिला आहे.
बाजारातील तेजीवर सरन्यायाधीशांची चिंता
भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी शेअर बाजारातील रेकॉर्ड तेजीवर चिंता व्यक्त केली आहे. बीएसई सेन्सेक्स 80 हजारांच्या घौडदौडीचा उल्लेख करत आता सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. खासकरुन या तेजीत बाजार नियामक सेबी आणि सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनलने अधिक सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सेबी आणि सॅटवर अधिक जबाबदारी
सरन्यायाधीश म्हणाले जस-जशी शेअर बाजारात तेजी वाढत आहे. मला वाटते सेबी आणि सॅटवरील जबाबदारी वाढणार आहे. माझ्या मते, अशा परिस्थितीत सेबी आणि सॅट सावधगिरी बाळगतील. ते बाजाराच्या यशाचा जल्लोष करतील, पण ते बाजार अधिक मजबूत होईल, याकडे पण लक्ष देतील. देशात स्थिर आणि अंदाज लावण्यायोग्य गुंतवणुकीची परिस्थिती तयार करण्याची मोठी जबाबदारी सेबी आणि सॅटवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आठवड्यात सेन्सेक्स 80 हजार अंकाच्या पुढे
सरन्यायाधीशांची टिप्पणी अशावेळी आली, ज्यावेळी बीएसई सेन्सेक्सने ऐतिहासिक 80 हजार अंकांचा टप्पा पार केला. केवळ सरन्यायाधीशच नाही तर इतर अर्थतज्ज्ञांनी पण या तुफान तेजीवर चिंता व्यक्त केली आहे. F&O सेगमेंटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या गुंतवणुकीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पण चिंता व्यक्त केली आहे. तर सेबी प्रमुख माधवी पुरी-बुच यांनी पण काही दिवसांपूर्वी मिड आणि स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये बुडबुड्याची आशंका व्यक्त केली होती.