Home Loan : तुम्ही पण घेतलंय गृहकर्ज, तर बंद करताना विसरू नका ही कागदपत्रं, निष्काळजीपणा पडेल महागात

| Updated on: Aug 18, 2024 | 3:15 PM

Home loan Closure : तुम्ही पण गृहकर्ज घेतलं आहे का? ते संपत आले असेल अथवा संपले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कर्ज फेडल्यावर संबंधित बँकेकडून ही दोन आवश्यक कागदपत्रे घ्यायला विसरु नका. नाहीतर मग पुढे अडचणीत वाढ होईल. कोणती आहेत ही दोन कागदपत्रं?

Home Loan : तुम्ही पण घेतलंय गृहकर्ज, तर बंद करताना विसरू नका ही कागदपत्रं, निष्काळजीपणा पडेल महागात
ही कागदपत्रं घेतलीत का?
Follow us on

घराचं स्वप्न पूर्ण करणं सोप नाही. अनेकांच्या आयुष्यात घर खरेदी करणे हा सर्वात मोठा व्यवहार असतो. स्वतःचा इमला खरेदी करण्यासाठी सर्वांकडेच मोठी रक्कम नसते. त्यामुळे चाकरमान्याला बँका, वित्तीय संस्थाकडे कर्जासाठी अर्ज करावा लागतो. कर्ज मंजूर झाल्यावर दरमहा एका ठराविक रक्कमेचा हप्ता जमा करावा लागतो. कर्ज घेताना आणि कर्ज फेडताना काही बाबींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कर्ज परतफेड केल्यानंतर तुम्हाला बँकेकडून ही कागदपत्रे घेणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा फटका बसू शकतो.

ही दोन कागदपत्रं महत्वाची

घर खरेदीसाठी सर्व बँका गृहकर्ज देतात. गृहकर्ज देताना तुमच्याकडून खरेदीची कागदपत्रे मालमत्ता नोंदणीची (Property Registry) कागदपत्रे ठेऊन घेतात. कर्ज परतफेड केल्यानंतर ही कागदपत्रे परत घेणे आवश्यक आहे. शेवटचा हप्ता जमा करताना एकरक्कमी हप्ता अथवा धनादेश देताना तुमची कागदपत्रे परत घ्या. दोन कागदपत्रे ना-हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) आणि बोजा प्रमाणपत्र ही दोन कागदपत्र जरूर परत घ्या.

हे सुद्धा वाचा

एनओसी महत्वाची

गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेकडून कर्ज फेड केल्याचा पुरवा म्हणून ना हरकत प्रमाणपत्र, एनओसी महत्वाचे कागदपत्र आहे. याचा अर्थ तुमच्याकडे बँकेचे कोणतेही कर्ज नाही असा होतो. तुम्ही बँकेची पै ना पै चुकती केल्याचे यावरुन स्पष्ट होते. होम लोन क्लोजर तारीख, रजिस्ट्रीनुसार, तुमचे नाव, बँकेची सविस्तर माहिती, कर्जासंबंधीची माहिती, मालमत्तेची सविस्तर माहिती यामध्ये असते. एकदा हा कागद नजरेखालून घाला. त्यात दुरुस्ती असेल तर त्वरीत करुन घ्या.

बोजा प्रमाणपत्र

दुसरे महत्वाचे प्रमाणपत्र हे बोजा प्रमाणपत्र (Encumbrance Certificate) आहे. कर्जाची परतफेड झाल्यावर रजिस्ट्रार कार्यालयातून हे प्रमाणपत्र मिळते. ज्या संपत्तीवर तुम्ही कर्ज घेतले. ते कर्ज तुम्ही फेडले आहे आणि आता मालमत्तेवर कर्ज नाही याची पुष्टी हे कागदपत्र करते. त्यामुळे हा दस्तावेज महत्वाचा असतो. हे कागदपत्रे घेणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष करणे अडचणीचे ठरेल.