मुंबई : नोटबंदी, जीएसटी (GST) आणि कोरोनासारखे (Corona) झटके सहन केल्यानंतर आता कुठं बांधकाम क्षेत्रात थोडी मागणी वाढली असताना नवं संकट उभं राहिलंय. बांधकाम साहित्याची महागाई (Inflation) आणि कर्जावरील वाढत्या व्याज दरामुळे बाजारात पुन्हा अस्थिरता आली आहे. एप्रिल-मे महिन्यातच देशातील अनेक शहरांमध्ये घरं दहा टक्क्यानं महाग झाली आहेत. यावर्षी देशभरात घरांच्या किमती सरासरी 7.5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक वाढ असणार आहे. तर 2023 आणि 2024 मध्ये किमती सहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयकडून व्याज दरात वाढ सुरू आहे. मेमध्ये रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट आणि चालू महिन्यात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. बांधकामासाठी लागणारा कच्चा माल आणि महाग कर्जामुळे घराच्या किमती वाढत आहेत.
2021 या वर्षात देशातील सात प्रमुख शहरांत 2.37 लाख घर बांधण्याची घोषणा झाली. यातील 63 टक्क्यांहून अधिक जास्त घरं मध्यम आणि मोठी घरं आहेत. यातील परवडणाऱ्या घरांची संख्या 26 टक्के आहे. 2019 मध्ये 40 टक्के घरं परवडणाऱ्या श्रेणीत होती, अशी माहिती प्रॉपर्टी फर्मकडून देण्यात आली आहे. 40 लाख रुपयांपर्यंतचे घरं ही परवडणाऱ्या श्रेणीत तर यावरील किमतीची घरं मध्यम आणि मोठी घरं असतात. 2021 मध्ये 8 मोठ्या शहरांत परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट होऊन ती 43 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. 2020 मध्ये 48 टक्के परवडणाऱ्या घरांची विक्री झाली होती.
एप्रिल 2022 च्या आकडेवारीनुसार रिटेल कर्जात 14.7 टक्क्यानं तेजी आलीये. यात सर्वाधिक वाटा हा गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा आहे. गृहकर्जात 13.7 टक्क्यांनी वाढ झालीये .एप्रिल 2021 मध्ये हेच प्रमाण 9.9 टक्के एवढे होते. अशी माहिती आरबीआयच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे कमी किंमत असलेल्या घरांसाठी कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण 6.1 टक्क्यांवरून 4.6 टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच लहान घर घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. कच्चा मालाच्या किंमतीतील वाढ आणि गृहकर्ज महाग झाल्यानं परवडणाऱ्या घरांच्या मागणीत घट झालीये. तसेच जीवनशैलीत बदल झाल्यामुळे अनेक जण आता परवडणाऱ्या घराऐवजी मध्यम आणि मोठी घर घेत आहेत, अशी माहिती मॅपल ग्रुपचे संचलाक क्रुणाल दायमा यांनी दिली आहे. म्हणजेच श्रीमंत लोकांची मोठ्या घरांची मागणी वाढल्यानं घरांच्या किमती वाढल्या आहेत, आणि वाढलेल्या भावामुळे कर्ज आणि बांधकामाचा खर्च वाढत चाललाय.