नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली. आरबीआयचे गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांत दास यांनी बुधवारी एमपीसीच्या बैठकीत (RBI MPC Meet June 2022) रेपो रेटमध्ये 0. 50 बेसिस पॉईंटच्या वाढीची घोषणा केली. यापूर्वी गेल्या महिन्यात चार मेला देखील आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. सुरुवातीला रेपो रेट चार टक्के इतका होता. त्यामध्ये 0.40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आल्यानंतर तो 4.40 टक्क्यांवर पोहोचला. आता पुन्हा एकदा त्यामध्ये 0. 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट 4.40 टक्क्यांहून 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याचे आरबीआयच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र रेपो रेटमध्ये वाढ झाल्याने महागाई कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. रेपो रेट वाढल्याने सर्वच प्रकारचे कर्ज महाग झाले आहेत तर ईएमआयमध्ये देखील वाढ झाली आहे. मग रेपो रेटमध्ये वाढ केल्यास महागाई कशी नियंत्रणात येऊ शकते असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
याबाबत बोलताना सेंटर फॉर इकोनॉमिक पॉलिसी अँण्ड पब्लिक फायनान्सेसचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. सुधांशू कुमार म्हणतात की, कोरोना काळात परिस्थिती गंभीर बनली होती. कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. रोजगार नसल्याने हातात पैसे नव्हते. पैशांभावी बाजारातील अनावश्यक वस्तुंची मागणी कमी झाली होती. नागरिक फक्त आपल्या गरजेच्याच वस्तू खरेदी करत होते. मागणीमधील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी तेव्हा आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ग्राहकांकडे पुरेशा प्रमाणात पैसे आल्याने वस्तुंच्या मागणींमध्ये वाढ झाली आहे. अनेक ग्राहक गरज नसलेल्या वस्तुंची देखील खरेदी करतात. याच कारणामुळे महागाई वाढते. याला आळा घालण्यासाठी आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.
दरम्यान देशात वाढत असलेल्या महागाईबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली आहे. रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र यंदा महागाईपासून दिलासा मिळेल असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात तेजी पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या दरात तेजी कायम राहिल्यास भारतात पेट्रोल, डिझेलचे भाव आणखी वाढू शकतात. इधनाचे वाढलेले दर हे महागाईला निमंत्रण देतात. त्यामुळे यंदा महागाई एखाद्या टक्क्याने आणखी वाढू शकते असे देखील त्यांनी म्हटले आहे.