नवी दिल्ली : आता केवळ पत्नी, मुलचं नाही तर आई-वडीलांनाही अजीवन निवृत्तीची रक्कम मिळू शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतंर्गत (EPFO) ही सुविधा लागू करण्यात आली आहे. कर्मचारी निवृत्ती योजना 95 (Employee Pension Scheme (EPS 95)) मध्ये यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे. पण अनेक कर्मचाऱ्यांना याची माहिती नाही.
कामगार आणि रोजगार मंत्रालय, भविष्य निर्वाह निधी संघटनेने निवृत्ती वेतन योजनेत हा महत्वपूर्ण बदल जाहीर केला होता. त्यासंबंधीची माहिती ही देण्यात आली होती.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला जेवढे मासिक पेन्शन मिळते. तेवढेच मासिक पेन्शन तेही अजीवन कर्मचाऱ्याच्या पालकांना, आई-वडिलांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ईपीएफओच्या नियमानुसार, कुटुंबात कर्मचारी एकटा कमविता असेल आणि त्याचे आई-वडिल त्याच्यावर अवलंबून असतील तर त्यांना या नियमांचा फायदा होईल. EPS 95 अंतर्गत त्यांना आजीवन पेन्शन मिळेल. त्यासाठी कर्मचाऱ्याला अर्ज भरून द्यावा लागतो.
EPS 95 या सेवेचा लाभ घेण्यासाठी एक अट आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्याने कमीत कमी 10 वर्षांची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्मचारी अपंग झाला तर त्याला ही आजीवन पेन्शन मिळू शकते. त्यासाठी दहा वर्षांची अट लागू नाही.
ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील (बेसिक+ महागाई भत्ता) 12 टक्के रक्कमेचे योगदान पीएफ खात्यात करण्यात येते. नियोक्ता, म्हणजे तुमची कंपनी हे योगदान पीएफ खात्यात जमा करते.
ही रक्कम दोन भागात विभागली जाते. 12 टक्क्यांतील 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते तर 8.33 टक्के रक्कम ईपीएस 95 मध्ये जमा करण्यात येते. जमा रक्कमेनुसार, तुम्हाला निवृत्तीवेळी एक निश्चित पेन्शन मिळते.