नवी दिल्ली : जर तुम्हाला गृहकर्ज (Home Loan), वाहन कर्ज अथवा वैयक्तिक कर्ज हवे असेल, कमी व्याज दरावर ही कर्ज मिळवू इच्छित असाल तर अगोदर सिबिलवर (CIBIL) लक्ष द्यावे लागेल. सिबिल स्कोअर जेवढा जास्त असेल, तेवढे कर्ज मिळणे सोपे होईल. सिबिल स्कोअरमुळे तुमच्यावरचा बँकेचा विश्वास वाढतो. तुम्हाला कर्ज देण्यासाठी त्या तयार होतात. सर्वसाधारणपणे 700 हून अधिक सिबिल स्कोअर सर्वात चांगला मानण्यात येतो. पण जर स्कोअर कमी असेल तर तो सुधारता येतो. पण त्यासाठी काही सोप्या गोष्टी कराव्या लागतील.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, यापूर्वी तुम्ही कर्ज घेतलेले असेल आणि त्याचे हप्ते तुम्ही वेळेवर भरत नसाल तर सिबिल स्कोअरवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कोणत्याही कर्जाचे EMI वेळेवर आणि नियमीत भरा. असे केल्यास तुमचा सिबिल स्कोअर चांगला राहील.
जर नवीन कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला जुने कर्ज अगोदर फेडावे लागेल. त्यामुळे दोन कर्जाचे ओझे घेण्याऐवजी पहिले कर्ज अगोदर फेडा. त्यामुळे तुमच्या कमाईवरचा मोठा भार हलका होईल. कमाईपेक्षा कर्ज जर जास्त असेल तर कोणतीही वित्तीय संस्था अथवा बँक नवीन कर्ज देणार नाही. जुने कर्ज फेडल्यास नवीन कर्ज सहज मिळू शकते.
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरात असाल तर पूर्ण क्रेडिट लिमिटचा उपयोग करु नका. तुम्हाला तुमच्या एकूण क्रेडिट लिमिटपेक्षा 30 टक्क्यांहून अधिकचा खर्च करणे योग्य ठरत नाही. नाहीतर उधळेपणाचा तुम्हाला फटका बसू शकतो. त्यामुळे तुम्हाला खर्च करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
कर्ज फेडण्यासाठी मोठा ईएमआय भरता येणे कठिण असल्यास तुम्हाला दीर्घकालीन पर्याय निवडणे आवश्य आहे. त्यामुळे ईएमआय कमी होईल आणि तो तुम्ही भरू शकाल. वेळेवर कर्ज फेड होत असल्याने तुमचा सिबिल स्कोअर सुधारेल.