ऑनलाईन फूड डिलव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी यावर्षी डिसेंबरपर्यंत आयपीओ, बाजारात आणण्याची शक्यता आहे. आयपीओ येण्यापूर्वी अनेक बड्या गुंतवणूकदारांनी त्यांचा पैसा या कंपनीत ओतला आहे. बिग बी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांनी या कंपनीचे शेअर अगोदरच खरेदी केले आहेत. मनी कंट्रोलने सूत्रांच्या आधारे एक वृत्त दिले आहे. त्यानुसार माधुरी दीक्षितने 345 रुपये प्रति शेअर प्रमाणे 1.5 कोटींचे शेअर खरेदी केले आहेत. इनोव8 (Innov8) चे संस्थापक रितेश मालिक यांच्या मदतीने दुय्यम बाजारात ही गुंतवणूक केली आहे. इनोव8 ही एक को-वर्किंग स्पेस कंपनी आहे. या दोघांनी मिळून जवळपास 3 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे.
ही कंपनी देत आहे संधी
तुम्हाला वाटत असेल की सामान्य गुंतवणूकदारांना अनलिस्टेड शेअरमध्ये गुंतवणूक करता येते का? कमाई करता येते का? तर काही ब्रोकरेज फर्म या NSDLआणि CDSL च्या मदतीने अनलिस्टेड कंपन्यांचे शेअर खरेदी करु शकतात. शेअर्सकार्ट, प्रीसाईज आणि स्टॉकीफाय यासारख्या कंपन्या तुम्हाला ही संधी देतात. पण यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर एक ठराविक रक्कम तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल.
असूचीबद्ध शेअर खरेदी करणार तरी कसे?
असूचीबद्ध शेअर खरेदी करण्यासाठी एक प्रक्रिया आहे. शेअर्सकार्ट, प्रीसाईज आणि स्टॉकीफाय यापैकी एका कंपनीच्या साईटवर जाऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्यासाठी अगोदर तुम्हाला तुमचा ब्रोकर निवडावा लागतो. त्यानंतर या वेबसाईटवर जाऊन आयडी क्रिएट करु शकता. त्यामध्ये गुंतवणूक करता येईल. प्रीसाईज प्लॅटफार्मवर 11 हजार गुंतवणुकीसह अनलिस्टेड शेअर खरीद करु शकता. जोनडॉटकॉम नुसार, स्विगीचा अनलिस्टेड शेअर 385 रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप
92 हजार कोटी रुपये आहे. या लॉटची साईज 1401 शेअर आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती कशी?
या आर्थिक वर्षात स्विगीचा महसूल 11,247 कोटी रुपयांचा होता. गेल्या वर्षीपेक्षा महसूलात 36 टक्के अधिक वाढ नोंदवण्यात आली. वर्षभरापूर्वी कंपनीचा महसूली आकडा 8265 कोटी रुपये होता. कंपनीच्या तोट्याचा आकडा 44 टक्क्यांनी कमी झाला आहे. तो आता 2350 कोटी रुपयांवर आला आहे. या आर्थिक वर्षात स्विगीची स्पर्धक झोमॅटोने 12,114 कोटी रुपयांची कमाई केली. तर या कालावधीत झोमॅटोला 351 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. यंदा झोमॅटोच्या शेअरमध्ये 120 टक्क्यांची उसळी दिसून आली. आता स्विगीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.