हुरून इंडिया श्रीमंतांची यादी 2024 (Hurun Rich List 2024) जाहीर झाली आहे. यामध्ये देशातील अनेक अब्जाधीशांचा समावेश आहे. देशात सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांना देण्यात आला आहे. त्यांनी अब्जाधीश आणि रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांना पिछाडीवर टाकले आहे. या यादीत 21 वर्षाच्या या तरुणाने इतिहास रचला आहे. झेप्टोचा सह-संस्थापक कैवल्य वोहरा (Youngest Indian On Hurun Rich List 2024) हा सर्वात कमी वयाचा देशातील अब्जाधीश ठरला आहे. त्याची एकूण संपत्ती 3,600 कोटी रुपये आहे. अवघ्या 21 वर्षी कैवल्य वोहरा याने 2021 मध्ये झेप्टो कंपनीची स्थापना केली होती. तर या कंपनीचे दुसरा संस्थापक आदित पालिचा हा देशातील दुसऱा कमी वयाचा अब्जाधीश ठरला आहे. तो अवघ्या 22 वर्षांचा आहे.
वर्ष 2021 मध्ये Zepto ची होणार सुरुवात
कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा दोघेही स्टँनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थी आहेत. पण काही तरी वेगळा उद्योग सुरु करायच्या विचाराने त्यांना पछाडले. त्यांनी कम्युटर सायन्सचा कोर्स मध्येच सोडून दिला. त्यानंतर कोरोना महामारीत अत्यावश्यक वस्तू घरपोच पोहचवण्याच्या व्यवसायात ते उतरले. त्यांनी 2021 मध्ये क्विक डिलिव्हरी ॲप झेप्टोची स्थापना केली. या क्षेत्रात ॲमेझॉन, स्विगी इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि टाटा समूहाच्या बिगबास्केट सारख्या कंपन्या अगोदरच उतरल्या आहेत.
प्रत्येक 5 दिवसात 5 अब्जाधीश
हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार भारतात प्रत्येक पाच दिवसांत एक नवीन व्यक्ती अब्जाधीश झाला आहे. हुरून इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद (Anas Rahman Junaid) याविषयी माहिती दिली. त्यानुसार, भारताने संपत्ती निर्मितीत अनेक देशांना मागे टाकले आहे. भारताने तिहेरी शतक ठोकले आहे. वर्ष 2023 मध्ये भारतात एकूण 75 नवीन अब्जाधीश होते. हुरून इंडिया रिच लिस्टमध्ये 386 अब्जाधीशांसह मुंबई हे शहर देशात पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दिल्ली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी एकूण 217 अब्जाधीश आहेत. तर हैदराबाद हे शहर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या शहरात 104 अब्जाधीश राहतात.