नवी दिल्ली : भारतात क्रिकेट हा श्वास आहे, तर काहींचा धर्म आहे. किक्रेट हेच त्यांचे जीवन आहे, नव्हे रोजचे जगणे आहे. आता भारतात आयसीसी विश्वचषकाचे (ICC Cricket World Cup 2023) आगमन होत आहे. हे वादळ यायला अजून जवळपास 100 दिवस बाकी आहेत. पण त्याचे परिणाम आताच दिसायला सुरुवात झाली आहे. अंतिम सामन्यापेक्षा पण भारत आणि पाकिस्तानमधील सामना दोन्ही देशांसाठी करो या मरोचा सामना असतो. हा सामना गुजरातमधील अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. त्यापूर्वीच येथील हॉटेल व्यावसायिक (Hotel) मालामाल झाले आहेत. त्यांच्यावर आतापासूनच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे.
असा झाला फायदा
नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सलामीचा सामना, अंतिम सामना यासोबतच हायहोल्टेज भारत-पाकिस्तान सामना खेळण्यात येणार आहे. अजून 100 दिवसांनी हा कुंभमेळा रंगणार आहे. देशावर क्रिकेटचा फिवर चढायला सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील जवळपास 80 टक्के हॉटेल आतापासूनच बुक झाले आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींचा हिरमोड होणार आहे. त्यांना सामना पाहुन थेट घराकडे निघावे लागेल. सामन्यासाठी वेळेच्या आधी स्टेडियमवर पोहचावे लागेल.
इतके जास्त भाडे
अहमदाबाद येथील अनेक हॉटेल्स सध्या बुक झाल्या आहेत. तर काही हॉटेल्समध्ये कमी रुम उरल्या आहेत. या रुमचे भाडे ऐकून तर तुमचा विश्वासच बसणार नाही. 100 दिवसांपूर्वीच या रुम्सचे भाडे 50 हजार ते एक लाख रुपयांच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे यापुढे किती भाडे वाढणार याचा अंदाज या आकडेवारीवरुन समोर येईल. तसेच त्यावेळी हॉटेलही उपलब्ध नसतील, तर काय व्यवस्था असेल असे प्रश्न समोर येत आहे.
अहमदाबादमध्ये तीन सामने
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वीच अहमदाबादमध्ये मोठी उलाढाल सुरु आहे. येथील हॉटेल्सनी अगोदरच फिरकी टाकली आहे. त्यांचा स्कोअर वाढला आहे. इंडस्ट्री सूत्रांनुसार, साडे तीन महिन्यापूर्वी बुकिंग वर काही श्रेणीतील रुम्सचे भाडे 50,000 रुपयांपर्यंत पोहचले आहे. सामने जाहीर होण्यापूर्वी या रुम्सचे भाडे 6,500-10,500 रुपयादरम्यान होते. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजीत करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सलामीचा सामना, अंतिम सामना यासोबतच हायहोल्टेज भारत-पाकिस्तान सामना खेळण्यात येणार आहे.
भारत-पाक सामन्यापूर्वीच बुकिंग
भारत-पाकिस्तानचे संघ 15 ऑक्टोबर रोजी भिडतील. विजयश्री खेचून आणण्यासाठी दोन्ही संघात चुरस असणार आहे. ही चुरस क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर बाहेर पण असते. या सामन्यासाठी खच्चून गर्दी असेल. तसेच टीव्हीवर, ऑनलाईन सर्व प्लॅटफॉर्मवर या सामन्यासाठीची उत्सुकता कायम असते. या सामन्यासाठी 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान बुकिंग आतापासूनच सुरु झाले असून मोठ्या प्रमाणात रुम बुक झाल्या आहेत. अनेक नामांकित, गल्ली बोळातील हॉटेल्सच्या 60-90 टक्के रुम बुक झाल्या आहेत.