नवी दिल्ली : आयडीबायआय बँकेने (IDBI Bank) चालू आर्थिक वर्षात दमदार कामगिरी बजावली. केंद्र सरकार (Central Government) गेल्या वर्षीपासून या बँकेच्या विक्रीची कवायत करत आहे. बँकेत एलआयसी आणि केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे. बँकेत निर्गुंतवणूक (Disinvestment) करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. ही प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थात कर्मचारी संघटनांनी खासगीकरणाला (Privatization) विरोध केला आहे. या घडामोडीत बँकेने जोरदार मुसंडी मारली आहे. बँकेने रेकॉर्डब्रेक नफा मिळवला आहे.
चालू आर्थिक वर्षात डिसेंबरच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेने हा पराक्रम केला. बँकेने 60 टक्के निव्वळ नफा मिळवला. बँकेचा एकूण नफा वाढून तो आता 927 कोटी रुपये झाला. बँकेने सोमवारी शेअर बाजाराला तिमाही निकालाची माहिती दिली. त्यानुसार, आर्थिक खर्चात कपात आणि व्याजाची कमाई यामुळे बँकेचा फायदा झाला.
यापूर्वीही बँकेने कमाईत झेंडा गाडला होता. एक वर्षांपूर्वी समान तिमाहीत बँकेने 578 रुपयांची निव्वळ कमाई केली होती. आयडीबीआय बँकेचा शेअर आज 55 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 56 टक्क्यांचा परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मधील तिमाहीत बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 23 टक्क्यांची वाढ होऊन 2,925 रुपये झाले. एक वर्षापूर्वी समान कालावधीत बँकेने निव्वळ व्याजातून 2,383 रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. पुनरावलोकनाधीन कालावधीत बँकेच्या एकूण नॉन-परफॉर्मिंग अॅसेट रेशोमध्ये सुधारणा दिसून आली.
नॉन-परफॉर्मिंग अॅसेट रेशोमध्ये 13.82 टक्क्यांची सुधारणा दिसून आली. तर एका वर्षापूर्वीच्या तिमाहीत बँकेचा नॉन-परफॉर्मिंग अॅसेट रेशो 21.68 टक्के होता. या तिमाहीत बँकेला कर्जासाठी 233 कोटींची तरतूद करावी लागली. त्यापूर्वी कर्जाची मोठी तूट होती. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत ही रक्कम 939 कोटी रुपये होती.
केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे आयडीबीआय बँकेत 94.71 टक्के हिस्सेदारी आहे. यामध्ये केंद्राचा वाटा 45.48 टक्के इतका आहे. तर एलआयसीचा हिस्सा 49.24 टक्के इतका आहे. दोन्ही प्रमुख हिस्सेदार त्यांचा वाटा विक्रीच्या तयारीत आहेत.
सरकारने यावर्षी 65,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी एक तृतीयांश रक्कम एलआयसीच्या आयपीओमधून उभारण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात आयडीबीआयचे खासगीकरण होईल का याबाबत गुंतवणूकदार साशंक आहेत.