मुंबई : अनेकदा आपण एटीएममधून पैसे काढण्यासाठी जातो, सर्व प्रक्रियाही पूर्ण होते, पण ऐनवेळी एटीएममधून पैसेच बाहेर येत नाहीत, पैसे एटमीएममध्येच अडकून पडतात. दुसरीकडे, प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात. असं अनेकदा अनेकांसोबत घडत असतं. आर्थिक वर्ष 2018 मध्ये बँकेच्या लोकपाल कार्यालयाला अशाप्रकारच्या तब्बल 16 हजार तक्रारी आल्या. तर, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एटीएम संबंधित तक्रारींमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर तुमच्या खात्यातून जे पैसे कापले जातात, बँक ते पैसे तुमच्या खात्यात पुन्हा जमा करते. ट्रान्झॅक्शनच्या काही तासांतच पैसे पुन्हा तुमच्या खात्यात जमा केले जातात. तर कधी-कधी यासाठी काही दिवसही लागतात. पण, जर तक्रारीनंतर सात कामाच्या दिवसांत तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नाही. तर, बँकेला त्यानंतर दर दिवसाला 100 रुपये इतकी भरपाई ग्राहकाला द्यावी लागते. हा नियम 1 जुलै 2011 पासून लागू झाला. जर तुमचेही एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाले असेल आणि पैसे परत आले नसतील, तर तुम्ही खालील नियमांद्वारे ते परत मिळवू शकता.
1. अशा परिस्थितीत पहिल्यांदा आपल्या बँकेशी संपर्क साधून त्यांच्याकडे यासंबंधी तक्रार करा. एटीएम कुठल्याही बँकेचं असलं तरी देखील तुम्ही बँकेकडे तक्रार करु शकता.
2. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, प्रत्येक एटीएममध्ये संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक, टोल फ्री क्रमांक, हेल्प डेस्क क्रमांक असणे अनिवार्य आहे. त्यावर संपर्क करुन तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
3. जर एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले असतील, तर बँकेला सात कामाच्या दिवसांत ते पैसे तुमच्या खात्यात पुन्हा जमा करणे अनिवार्य आहे.
4. तक्रार केल्याच्या सात दिवसांच्या आत जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. तर, बँकेला दर दिवसाला 100 रुपये इतकी भरपाई ग्राहकाला द्यावी लागते. यासाठी ग्राहकाला दावा करण्याची गरज नसते. मात्र, भरपाईसाठी ग्राहकाला ट्रान्झॅक्शनच्या 30 दिवसांच्या आत तक्रार दाखल करणे गरजेचं आहे.
5. जर निश्चित वेळेत तुमच्या समस्येचं समाधान झालं नाही. तर बँकेकडून उत्तर मिळाल्याच्या 30 तीस दिवसांच्या आत तुम्ही बँकेच्या लोकपालकडे यासंबंधी तक्रार करु शकता.
संबंधित बातम्या 😕
क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
‘या’ आठ शेअर्समध्ये गुंतवणूक करा, नक्कीच फायदा मिळेल