मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या ग्राहकांनी अकाऊंटशी मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, त्यांची नेट बँकिंग सुविधा 1 डिसेंबरपासून बंद होणार आहे. ज्या ग्राहकांनी नेट बँकिंगमध्ये मोबाईल नंबर नोंदवलेला नसेल, त्यांना याचा फटका बसणार आहे. नेट बँकिंग सेवा कायम ठेवायची असेल तर 1 डिसेंबरपूर्वी नंबर रजिस्टर करा, अन्यथा ग्राहकांना ब्लॉक केलं जाणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 6 जुलै 2017 रोजी एक आदेश काढला होता. त्यानुसार, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या इलेक्ट्रॉनिक बँकिंग सुविधांसाठी मोबाईल नंबर रजिस्टर करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे सेवा कायम ठेवायची असेल, तर मोबाईल नंबर रजिस्टर करणं अनिवार्य आहे.
30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. म्हणजेच ग्राहकांच्या हातात फक्त एक दिवस उरला आहे. जवळच्या एसबीआयच्या शाखेत जाऊन तुम्ही मोबाईल नंबर लिंक करु शकता. दरम्यान, तुमचा नंबर अगोदरपासूनच रजिस्टर्ड आहे किंवा नाही हे तुम्ही नेट बँकिंगच्या माध्यमातून चेक करु शकता. तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल, तर तुमची होम ब्रांच किंवा जवळच्या कोणत्याही एसबीआयच्या शाखेत जाऊन नंबर आणि ई-मेल आयडी रजिस्टर्ड करावा लागेल.
नंबर रजिस्टर्ड आहे किंवा नाही कसं चेक कराल?
सर्वात अगोदर एसबीआयच्या www.onlinesbi.com या वेबसाईटवर लॉग ऑन करा.
यानंतर तुम्हाला तुमचा बँकिंग आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.
लॉग इन झाल्यानंतर अकाऊंटमध्ये जा, प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक करा.
प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक करा आणि माय अकाऊंट आणि प्रोफाईल टॅबवर क्लिक करा
यानंतर पर्सनल डिटेल्स आणि मोबाईल ऑप्शन निवडा.
आता तुमचा प्रोफाईल पासवर्ड टाका. हा पासवर्ड लॉग इन पासवर्ड पेक्षा वेगळा असतो.
यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यात रजिस्टर्ड नाव, ई-मेल आयडी आणि लिंक असलेला मोबाईल नंबर दिसेल.
यामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल, तर ती जागा रिकामी दिसेल. ही जागा रिकामी दिसत असेल तर तातडीने बँकेशी संपर्क साधा
मोबाईल नंबर लिंक न केल्यास इंटरनेट बँकिंग बंद होईल, इतर सुविधा चालू राहतील.