नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दोन दिवसांपूर्वी सलग पाचव्यांदा रेपो दरात 35 बीपीएसची वाढ केली. त्यामुळे रेपो दर (Repo Rate) 5.9% टक्क्यांहून थेट 6.25% टक्क्यांवर पोहचला. केंद्रीय बँकेच्या या निर्णयामुळे वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज आणि त्याचे हप्ते महागले आहेत. सध्याच्या ग्राहकांच्या खिशावर त्याचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे कर्जदार हवालदिल झाले आहेत. पण दुसऱ्या बाजूला त्याचा मुदत ठेवीत (FD) गुंतवणूकदारांना काय फायदा होईल ते पाहुयात..
व्याजदर वाढीचा फटका कर्जदारांना बसणार आहे. तसेच बँकेतील विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना व्याजदर वाढीचा फायदा होणार आहे. येत्या काही दिवसात बँका मुदत ठेव योजनांमधील व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठेवीदारांना अधिकचा परतावा मिळेल.
तुम्ही पण या संधीचे सोने करु इच्छित आहात का? परंतु, बाजारातील तज्ज्ञांनी घाईत कोणाताही निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे. मुदत ठेवीत गुंतवणूकीसाठी काही दिवस वाट पाहण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामागची त्यांनी दिलेली कारणं समजून घेऊयात.
तज्ज्ञांच्या मते व्याजदरातील वाढ ही केवळ रेपो दरावर अवलंबून नाही. क्रेडिट ग्रोथ रेटचा ही ठेवीतील वृद्धीवर परिणाम दिसून येतो. जोपर्यंत क्रेडिट ग्रोथ रेट चांगले प्रदर्शन करेल, तोपर्यंत ठेवीचा वृद्धी दर चांगले प्रदर्शन करेल. वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी बँका आकर्षक व्याजदर ठेवतील.
Paisabazaar चे सह संस्थापक नवीन कुकरेजा यांच्या मते, सध्याच्या ठेवीदारांनी त्यांची गुंतवणूक सुरळीत ठेवण्यास हरकत नाही. सध्याची एफडी तोडून, बंद करुन नवीन एफडी सुरु करणे हितवाह नाही. कारण नवीन एफडीचे व्याजदर आणि जून्या एफडीवर मिळणारे व्याजदरात फार मोठा फरक नसतो. तसा फरक जर पडत असेल तरच याविषयीचा निर्णय घ्यायला हवा.
जर एखाद्याला मुदत ठेवीत गुंतवणूक वाढवायची असेल तर त्याने ती दीर्घकाळासाठी करु नये. शॉर्ट टर्मसाठी, अल्प कालावधीसाठी ही गुंतवणूक करण्याचा सल्ला कुकरेजा यांनी दिला आहे. तसेच ठेवीदारांनी गुंतवणूक करताना ऑटो रिन्यूअल सुविधेपासून वाचावे असा सल्ला ही त्यांनी दिला.