नवी दिल्ली | 7 February 2024 : गेल्या एका वर्षात शाकाहारी जेवणाची थाळी महागली आहे. शाकाहारी जेवणासाठी खिशावर ताण आला आहे. तर दुसरीकडे मांसाहारी जेवणाऱ्यांची मात्र चंगळ झाली आहे, हा धक्कादायक खुलासा क्रिसिल या संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे. गेल्या महिन्याशी तुलना करता शाकाहारी भोजन करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटो आणि कांद्याच्या किंमती घसरल्याने हा बदल झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, हे आकडे महागाई कमी होण्याचे संकेत देत आहेत. क्रिसिल रिपोर्टमध्ये अजून काय म्हटले आहे, ते जाणून घेऊयात..
एका वर्षात व्हेज थाली किती महागली?
टोमॅटो आणि कांद्याची आवक वाढल्याने किंमती नियंत्रणात आल्या. त्यामुळे कांद्याच्या किंमतीत 26 टक्के तर टोमॅटोच्या किंमतीत 16 टक्के कपात झाली. या अहवालात शाकाहारी थाळीचा जो भाव देण्यात आला आहे, प्रत्यक्षातील किंमती त्याहून अधिक असल्याचे समोर येते. पण या अहवालानुसार, जानेवारीत व्हेज थालीची किंमत 28 रुपये होती. तर त्यापूर्वी एक महिन्याअगोदर डिसेंबर महिन्यात ही किंमत 29.7 रुपये होती. तर एक वर्षापूर्वी जानेवारी 2023 मध्ये थाळीचा भाव 26.6 रुपये होता.
एका वर्षात शाकाहारी थाळी महागली
जानेवारीत महागाईचा आकडा कमी
थाळीच्या किंमतींनी संकेत दिल्यानुसार, डिसेंबर महिन्यात महागाई गेल्या चार महिन्याच्या उच्चांकावर 5.7 टक्क्यांवर होती. गेल्या जानेवारी महिन्यात हा आकडा कमी होण्याची शक्यता आहे. बार्कलेजच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात महागाई कमी होऊन 5.4 टक्क्यांवर येईल. त्यामुळे आरबीआय येत्या काळात, जून वा ऑगस्ट 2024 मध्ये रेपो दरात 25 बीपीएस कपातीचा सूखद धक्का देऊ शकते.