नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : आता सणासुदीचे (Festival Season) दिवस आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळी अवघ्या एका महिन्यावर आली आहे. इतर सणांची पण रेलचेल आहे. वातावरण उत्साहाचे आहे. खरेदीची लगबग दिसून येत आहे. महागाईने सर्वसामान्य हैराण असला तरी खरेदीचे आकडे वेगळाचा दावा करताना दिसत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलेले आहे. पण ऑनलाईन खरेदीचे प्रमाण, कार, बाईक खरेदीचे आकडे उत्साहवर्धक आहे. जुलै ते सप्टेंबर या काळातील आकड्यांनी तर नवीन झेप घेतली आहे. येत्या दिवाळीपर्यंत खरेदीत अजून मोठा पल्ला गाठल्या जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. देशात कोणत्या वर्गाचे उत्पन्न (Income Source) वाढले, कोणता वर्ग ही खरेदी करत आहे?
73 टक्के लोकांचे उत्पन्न वाढले
देशात मोठ्या प्रमाणात खरेदीची लाट आली आहे. हे आकड्यावरुन समोर आलेच आहे. UBS Evidence Lab या संस्थेने याविषयीची आकडेवारी समोर आणली आहे. त्यानुसार देशातील 73 टक्के लोकांचे उत्पन्न वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. तर 24 टक्के लोकांच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. तर 70 टक्के नागरिकांनी येत्या एका वर्षांत त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा आहे. 65 टक्के लोकांनी उत्पन्न वाढल्याने महागाईशी दोन हात करता आल्याचा दावा केला आहे.
डिजिटल पेमेंटमध्ये येईल घसरण
युबीएस ईव्हीडन्स लॅबने हा सर्व्हे केला आहे. त्यात 18 ते 54 वर्षे वयोगटातील 1500 लोकांचा सहभाग होता. अर्थात हा नवश्रीमंत वर्ग असल्याचे समोर आले आहे. ते उच्च श्रीमंत अथवा मध्यम श्रीमंत गटातील असल्याचे समोर आले आहे. ज्या वर्गांनी जास्त खरेदी केली, त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. भविष्यात डिजिटल पेमेंटमध्ये कमी येण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. 71 टक्क्यांमधील 58 टक्के लोकांनी डिजिटल पेमेंटवर विश्वास दाखवला. तर रोखीत व्यवहार करण्याची टक्केवारी 27 टक्क्यांहून 35 टक्क्यांवर पोहचली आहे. यामागील कारणं समोर आली नाहीत .