नवी दिल्ली : सध्या सराफा बाजारात 2000 रुपयांच्या गुलाबी नोटा आणि कमी झालेले भाव याचीच चर्चा आहे. खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली आहे. घरात साठवलेल्या गुलाबी नोटांनी सराफा बाजाराचा रस्ता धरला आहे. त्यांच्यासाठी अर्थातच सोने महाग आहे. कारण केवळ दोन हजारांच्याच नोटा घेऊन येणाऱ्या ग्राहकांना सोने आणि चांदी महागत पडत आहे. या नोटांचे ओझे सांभाळण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागत आहे. सध्या डॉलर वरचढ ठरल्याने सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) घसरण दिसून येत आहे. सोने-चांदीला एका ठराविक भावाच्या पलिकडे उडी मारता येत नसल्याचे दिसून येते. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये चढउताराचे सत्र सुरु आहे. भावात मोठी वाढ न झाल्याने ग्राहकांची पावले सराफा बाजाराकडे वळली आहेत.
आजचा भाव काय
IBJA नुसार, मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,342 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 55,273 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. goodreturns नुसार आज 22 कॅरेटचा भाव 56,150 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, सकाळच्या सत्रात भावात कोणताही बदल झालेला नाही.
मंगळवारी झाली घसरण
goodreturns नुसार मंगळवारी 22 कॅरेटच्या भावात 290 रुपयांची घसरण झाली होती.24 कॅरेट सोन्यात 310 रुपयांची घसरण झाली होती. त्यापूर्वी 20 मे रोजी अनुक्रमे 500 रुपयांची आणि 550 रुपयांची दरवाढ झाली होती.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,342 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,100 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,273 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,257 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.