नवी दिल्ली : सातत्याने गेल्या दोन वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) चीनपेक्षा जोमाने धावत आहे. एका अंदाजानुसार, यंदा भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 7 टक्के असेल. तर वर्ष 2022 मध्ये चीन आपल्या अर्ध्यातही पोहचू शकणार नाही. चीनचा वृद्धी दर (China Growth Rate) केवळ 3 टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी पण भारताने 9.1 टक्के वृद्धी दराने चीनला मात दिली होती. त्यावेळी चीनचा वृद्धी दर 8.1 टक्के होता. भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक मंचावर मजबूत प्रदर्शन आणि पकड ठेवली आहे. पण चीनशी स्पर्धेत भारत अजूनही ठसठशीतपणे का उभा राहत नाही, हा खरा प्रश्न आहे. कारण आकडे हे भविष्यातील अंदाज वर्तवितात. त्यामुळे या थकविणाऱ्या धावपट्टीत कोण कोणाला पिछाडीवर टाकतो, हे लवकरच समोर येईल.
जागतिक मंचावर चीन आणि भारत लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. भारतात लोकशाही आहे तर चीनमध्ये एकपक्षीय ढाच्यात कारभार हाकण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशात तुलनात्मक आढावा स्वाभाविक आहे. 2014-18 या चार वर्षांत पहिल्यांदाच भारताने शेजारच्या चीनला 7 टक्के वृद्धी दराने धोबी पछाड दिली. भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून गेल्या काही वर्षांपासून अग्रेसर आहे. गेल्या तीन दशकांपासून चीन या स्थानावर होता.
वर्ष 2019 आणि 2020 या काळात चीनने भारतापेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे. 2019 मध्ये चीनचा आर्थिक वृद्धी दर 6 टक्के तर भारताचा वृद्धी दर 3.9 टक्के होता. कोविडपूर्व काळात चीनच्या आर्थिक वृद्धीत 2.2 टक्के तर भारताच्या वृद्धी दरात 5.8 टक्के कमी आली. 2014 ते 2022 या 9 वर्षांत चीनने सरासरी 6 टक्क्यांपेक्षा अधिकचा वृद्धी दर गाठला आहे. तर याच काळात भारताचा जीडीपी 5.7 टक्के होता. पण कोविडच्या एका वर्षा अगोदरपासून भारतीय अर्थव्यवस्थेने चीनपेक्षा अधिक आघाडी घेतल्याचे समोर येते.
या दोन देशांपैकी जगातील सर्वात झपाट्याने आगेकूच करणारी अर्थव्यवस्था कोणती हे आकडेवारीवरुन मात्र निश्चितपणे सिद्ध करता येत नाही. हा अंदाज खुंटतो. भविष्यातील कोणाची घौडदौड सर्वात जोरदार असेल याचा अंदाज बांधताना त्याचा उपयोग होतो. निश्चितपणे नाही, पण आकडेवारीवरुन भारत या आर्थिक वर्षात (2023-24) चीनपेक्षा सरस ठरेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या अंदाजानुसार, चीनचा वृद्धी दर 4.4 टक्के तर भारताचा वृद्धी दर 6.1 टक्के असेल. पण गेल्या काही आठवड्यांपासून चीनने धोरणात बदल केला आहे. कोविडसाठीच्या झिरो धोरणाचा त्याने त्याग केला आहे. त्याने खुलेपणा स्वीकारला आहे. त्यामुळे भांडवल खेळते राहिले आहे. लॉकडाऊननंतर लोक खुलेपणाने बाहेर पडले आहे.
त्यामुळे काही तज्ज्ञांनी 2023 साठी चीनचा वृद्धीदर वाढेल असा अंदाज वर्तविला आहे. काहींनी चीन 5.5 टक्के वृद्धी दर गाठेल असा विश्वास व्यक्त केला आहे. काहींनी त्यापेक्षा पुढचा आकडा गृहीत धरला आहे. तर भारताविषयीचा अंदाज मात्र कमी करण्यात आला आहे. त्यामुळे जगातील महाकाय लोकसंख्या असणाऱ्या या दोन महासत्ता त्यांचा अंदाजित वृद्धीदर गाठतील का? की लक्ष्य गाठताना त्यांची दमछाक होईल हे येता काळच सांगू शकेल. पण भारताला पायाभूत सुविधा आणि औद्योगिक सुविधा निर्माण करण्यासाठी झपाट्याने एक मॉडेल लवकरच उभे करावे लागेल हे स्पष्टच आहे. तरच तो चीनशी स्पर्धा करु शकतो.