करदात्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आतापर्यंत 4 कोटींहून अधिक लोकांनी आयकर रिटर्न भरला आहे. गेल्यावर्षी 31 जुलैपर्यंत जवळपास 7.5 कोटी आरटीआय दाखल करण्यात आले होते. म्हणजे अजून अनेक जणांनी आयटीआर दाखल केलेला नाही. 31 जुलै ही आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यातच सोशल मीडियावरुन आयकर दाखल करण्याची तारीख वाढविल्याचे मॅसेज फिरत आहे. त्यामुळे करदाते संभ्रमात आहे. यावर आयकर खात्याने खुलासा केला आहे.
काय करण्यात येत आहे दावा
सोशल मीडियावर गुजरातमधील एका दैनिकातील वृत्ताच्या आधारे आयकर भरण्याची मुदत वाढविल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानुसार आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही मुदत आयकर विभागाने वाढविल्याची पुस्ती पण जोडण्यात आली आहे.
काय आहे सत्य?
या वृत्तानुसार, 31 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत आयटीआर भरता येईल असा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा मॅसेज व्हायरल झाला आहे. त्याची दखल आयकर खात्याने घेतली आहे. अशा मॅसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आयकर खात्याने केले आहे. आयटीआर फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2024 हीच असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. काही फसवणूक करणारे एसएमएस आणि ई-मेल पाठवून टॅक्स रिफंडचा दावा करत आहे, त्याच्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढीची मागणी का?
देशातील अनेक करदात्यांनी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख वाढविण्याची मागणी केली आहे. चार्टड अकाऊंटड यांनी पण तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आयकर फाईल करण्याची मुदत वाढवण्याची वकिली केली आहे. ICAI, कर्नाटक स्टेट चार्टर्ड अकाउंटेंट्स असोसिएशन (KSCAA) आणि ऑल गुजरात फेडरेशन ऑफ टॅक्स कंसल्टेंट्स या सारख्या संघटनांनी आयकर वाढविण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 करण्याची मागणी केली आहे.
आयकर विभागाचे आवाहन
आयकर विभागाने यासंबंधी X वर पोस्ट केली आहे. त्यांनी यासंबंधीच्या वृत्ताची आणि सोशल मीडियावरील संदेशाची माहिती देत, हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. करदात्यांनी कोणत्याही प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी Income Tax India च्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.