नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारतामध्ये सोन्याच्या (Gold) दागिन्यांच्या मागणीमध्ये पाच टक्के घट होण्याचा अंदाज आहे. सोन्याच्या मागणीमध्ये घट होऊन ती 550 टनांवर येऊ शकते, असा अंदाज एका अहवालामध्ये वर्तवण्यात आला आहे. सोन्याच्या मागणीमध्ये घट होण्याचे कारण म्हणजे सोन्याच्या कस्टम ड्यूटीमध्ये(Customs Duty) करण्यात आलेली वाढ हे आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. तीस जून रोजी सोन्याच्या सीमा शुल्कात पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सोन्यावर आकारण्यात येणारी कस्टम ड्यूटी ही 12.5 टक्क्यांवर पोहोचली आहे. करामध्ये वाढ करण्यात आल्याने सोन्याच्या दरात (Gold rate) देखील वाढ होणार आणि या वाढलेल्या किमतीचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या मागणीमध्ये पाच टक्के घसरणीचा अंदाज असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.
गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोनाचे सावट कमी झाल्याने तसेच सोन्यावरील कस्टम ड्यूटीमध्ये पाच टक्क्यांची कपात आणि सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली होती.मात्र यंदा परिस्थिती उलटी आहे. सोन्याच्या कस्टम ड्यूटीमध्ये पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात तेजी आल्यास त्याचा भार हा ग्राहकांवरच पडणार आहे. सोन्याचे दर वाढल्यास सोन्याच्या मागणीत घट होऊ शकते. यंदा सोन्याच्या मागणीत पाच टक्के घट होण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात सोन्याची मागणी 580 टन एवढी होती.तर यंदा मागणी घसरून ती 550 टन होण्याची शक्यता असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.
आज सोन्याच्या दरात किंचित तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. आज 22 कॅरट सोन्याचा दर हा प्रति तोळा 46,410 रुपये इतका आहे. बुधवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,400 इतका होता. आज सोन्याच्या दरात तोळ्यामागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी स्वस्त झाली असून, चांदीचे दर किलोमागे 300 रुपयांनी कमी झाले आहेत. आज चांदीचा दर प्रति किलो 55,600 रुपये इतका आहे. बुधवारी चांदीचा दर प्रति किलो 55,900 रुपये इतका होता.