नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण योग्य फंडात गुंतवणूक करणे, फंडाचा कामगिरी तपासणाऱ्यांची संख्या खरंच जास्त आहे का? कारण योग्य पोर्टफोलिओशिवाय कोणताही गुंतवणूकदार श्रीमंत होऊ शकत नाही. आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी पोर्टफोलिओत योग्य फंड असणे महत्वाचे आहे. म्युच्युअल फंड ही जोखीमेची गुंतवणूक असली तरी त्याचा परतावा जोरदार मिळतो. पण काही फंड जोरदार परतावा देण्यात कमी पडतात. तेव्हा योग्य फंडची निवड आवश्यक आहे. तर SIP मध्ये दरवर्षी 5% रक्कम वाढवणे पण फायद्याचे ठरते.
दरवर्षी एसआयपीत करा वाढ
म्युच्युअल फंडातून अधिकचा फायदा घेण्यासाठी एसआयपीत (SIP) दरवर्षी अधिकची वाढ करण्याचा सल्ला देण्यात येतो. दरवर्षी जवळपास 10 टक्क्यांची वाढ केली तर शेवटी जोरदार फायदा मिळतो. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच गुंतवणूक वाढवणे फायदेशीर ठरते. तुम्ही दोन प्रकारे एसआयपीतील गुंतवणूक वाढवू शकता. दरवर्षी एक निश्चित रक्कम एसआयपीत वाढवा. समजा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही दरमहा 10 हजार रुपये गुंतवणूक करतात. तर अशावेळी प्रत्येक वर्षी त्यामध्ये 1 हजार वा 2 हजार रुपयांची वाढ करणे फायदेशीर ठरते.
दरमहा रक्कम वाढवा
तुम्हाला वाटल्यास दरवर्षी एक ठराविक रक्कम एसआयपीत वाढवू शकतात. मासिक एसआयपीत प्रत्येक वर्षी 10 ते 20 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक वाढवू शकता. काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना ऑटोमॅटिक टॉप अपची सुविधा देतात. म्हणजे दरवर्षी गुंतवणूकदारांची रक्कम वाढते. म्युच्युअल फंड निवडताना ही सुविधा ऑटोमॅटिक आहे का, की स्वतः ही रक्कम टाकावी याविषयीचा पर्याय तपासून घ्या.
असे आहे गणित
जर तुम्ही एसआयपीत दरमहा 5,000 रुपयांची गुंतवणूक 15 वर्षांसाठी करत असाल तर 12 टक्के परतावा गृहीत धरता 26 लाख रुपये मिळतील. पण या गुंतवणुकीत तुम्ही वार्षिक 5 टक्क्यांची वाढ केली तर ही रक्कम 15 वर्षानंतर 32 लाख रुपये होईल. एसआयपीतील हा बदल तुमच्या फायद्याचा ठरेल. पहिल्या वर्षी तुम्ही 250 रुपयांची जास्त गुंतवणूक कराल. त्याच्या दुसऱ्या वर्षी ही रक्कम 262 रुपये, नंतर 275 रुपये अशी वाढेल. यामुळे बजेटवर पण ताण येणार नाही आणि गुंतवणूक वाढल्याने शेवटी मोठा फायदा होईल.