महागाईमुळे स्वप्नातील घर महागले आहे. आता या महागाईत सिमेंट कंपन्यांनी तेल ओतले आहे. कोळशाच्या किंमतींनी रेकॉर्ड तोड भरारी घेतल्याने सिमेंट उत्पादक कंपन्यांना घाम फुटला आहे. कोळशाची (coal) किंमत प्रति टन 60 डॉलरवरून 300 डॉलरवर पोहचली आहे. त्याचा थेट परिणाम सिमेंट उत्पादनावर झाला आहे. वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी, सिमेंटची प्रमुख उत्पादक कंपनी इंडिया सिमेंट्स लिमिटेडने (The India Cements Ltd) पुढील एका महिन्यात तीन टप्प्यांमध्ये सिमेंटच्या किंमतीत प्रति बॅग (per bag) 55 रुपयांच्या वाढीचा निर्णय घेतला आहे. चौथ्या तिमाहीत तोटा झाल्यानंतर, कंपनीने आपल्या अतिरिक्त जमिनीचा काही भाग विकण्याची आणि यावर्षी आपले कर्ज कमी करण्यासाठी पैसे उभारण्याची योजना आखली आहे. 1 जूनपासून सिमेंटच्या प्रति बॅगच्या किंमतीत 20 रुपये, 15 जूनपासून आणखी 15 रुपये आणि 1 जुलैपासून अतिरिक्त 20 रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव इंडिया सिमेंट्सने ठेवला आहे.
या दरवाढीबाबत बोलताना, इंडिया सिमेंट्सचे उपाध्यक्ष आणि एमडी एन श्रीनिवासन म्हणाले की, या दरवाढीमुळे कंपनीचा तोटा भरून काढण्यासाठी मदत होईल. इतर सिमेंट उत्पादक कंपन्या या दरवाढीचे अनुसरण करतील की नाही,याची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वेळी कंपनीने सिमेंटच्या किंमतीत इतकी मोठी वाढ केव्हा केली होती हे मला आठवत नाही. “या क्षेत्रात सिमेंटची विक्री करणारे 40 वेगवेगळे ब्रँड आहेत, ज्याची किंमत 320 ते 400 रुपये प्रति बॅग आहे. आमची उत्पादने दर्जेदार आहेत आणि आम्ही नेहमीच त्याची किंमत 360 रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीत जास्त ठेवली होती, असे त्यांनी सांगितले.
आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला 23.7 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तर वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 71.6 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत (Q4FY21) मध्ये 1,449.62 कोटी रुपयांवरून 1,391.99 कोटी रुपयांवर घसरला होता. संपूर्ण आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष 2022) निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2021 मध्ये 222 कोटी रुपयांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घसरून 38.9 कोटी रुपयांवर आला आहे. त्याचा व्यवसाय वृद्धीवर विपरीत परिणाम दिसून आला, व्यवसाय मूल्य 11टक्क्यांनी घसरले तर विविध उत्पादन खर्चात 33% ने वाढ झाली.
आपल्या अतिरिक्त जमिनीचे मुद्रीकरण करण्याच्या निर्णयावर श्रीनिवासन म्हणाले की, कंपनीकडे सुमारे 26,000 एकर जमीन आहे आणि ती मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आहे, याशिवाय शहरातील काही भागात आणि शहराच्या जवळ आहेत. “आमच्याकडे एक अंतर्गत गट तयार केला आहे, जो कर्ज फेडण्यासाठी अतिरिक्त जमिनींपैकी काही जमीन विकण्यासाठी आणि सुधारणेसाठी गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त आहे. पण सध्या कंपनीला विक्रीची घाई नाही. कंपनी योग्य संधीची वाट पाहत असल्याचे ते म्हणाले.